
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता १० वर्षे वयापासून पुढील अल्पवयीन मुलांना स्वतःचं बचत आणि मुदत ठेव खातं उघडण्याची व स्वतंत्रपणे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत पालकच आपल्या लहान मुलांच्या नावाने हे खाते हाताळत होते. याबाबत सोमवारी आरबीआयने सर्व बँकांना अधिसूचना जारी केली आहे. १ जुलैपासून नवीन नियम लागू होतील. दहा वर्षावरील मुलांसाठी बँक आपली जोखीम व्यवस्थापन धोरण लक्षात घेऊन बचतेची रक्कम व इतर नियम ठरवू शकतात, असे आरबीआयने आपल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधील ठळक मुद्दे:
कोणत्याही वयात खाते: बँका कोणत्याही वयाच्या अल्पवयीन मुलांना नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकांच्या माध्यमातून बचत वा मुदत ठेव खाते उघडण्याची परवानगी देऊ शकतात. आईलाही अशा खात्यांमध्ये पालक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आरबीआयने १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या आपल्या जुन्या परिपत्रकानुसार, अशा खात्यांसाठी मातांना पालक म्हणून मान्यता देण्याची तरतूद पुन्हा अधोरेखित केली आहे.
१० वर्षांनंतर स्वतंत्र व्यवहार: १० वर्षांवरील अल्पवयीन मुलांना बँका स्वतंत्रपणे आपले खाते उघडण्याची व चालवण्याची संधी देऊ शकतात. मात्र, यासाठी संबंधित बँकेचे जोखीम धोरण लक्षात घेऊन अटी व शर्ती ठरवल्या जातील आणि त्या खातेदाराला स्पष्टपणे सांगाव्या लागतील.
वयाची अट पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया : १८ वर्षांचे पूर्ण झाल्यावर खातेदाराची नवीन सही व व्यवहार सूचना घेणे बँकांना बंधनकारक असेल. जर खाते पालकाच्या देखरेखीखाली चालवले जात असेल, तर शिल्लक रक्कम खातेदाराच्या नावावर निश्चित केली जाईल.
आधुनिक बँकिंग सुविधा: बँकांच्या जोखीम धोरणानुसार, अल्पवयीन खातेदारांना इंटरनेट बँकिंग, एटीएम/डेबिट कार्ड्स आणि चेकबुक यांसारख्या सुविधा देण्याची परवानगी बँकांना आहे.