कमी मान्सून धोकादायक; रिझर्व्ह बँक गव्हर्नरांनी पश्चिम आशियातील संकटाबाबतही व्यक्त केली चिंता

पश्चिम आशियातील संकट आणि कमकुवत मान्सूनची शक्यता आर्थिक वाढीसाठी मोठे धोके निर्माण करत आहेत, अशी चिंता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे.
कमी मान्सून धोकादायक; रिझर्व्ह बँक गव्हर्नरांनी पश्चिम आशियातील संकटाबाबतही व्यक्त केली चिंता
कमी मान्सून धोकादायक; रिझर्व्ह बँक गव्हर्नरांनी पश्चिम आशियातील संकटाबाबतही व्यक्त केली चिंता(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकट आणि कमकुवत मान्सूनची शक्यता आर्थिक वाढीसाठी मोठे धोके निर्माण करत आहेत, अशी चिंता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे.

दूरदर्शन न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, जागतिक अनिश्चितता असूनही भारताने गेल्या काही वर्षांत ७ टक्क्यांहून अधिक विकास दर अनुभवला आहे. मजबूत आणि भक्कम मॅक्रोइकॉनॉमिक पायाभूत घटकांच्या पाठबळामुळे गेल्या आर्थिक वर्षात भारताने ७.७ टक्के विकास दर नोंदवला.

विविध आव्हाने असूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षासाठी ६.६ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला आहे, असे त्यांनी सांगितले. गव्हर्नर म्हणाले की, मौद्रिक आणि वित्तीय धोरणे मजबूत आहेत आणि त्यामुळेच आपण उच्च जीडीपी वाढ पाहत आहोत.

मान्सून जोखमीबद्दल संजय मल्होत्रा म्हणाले की, मान्सून कसा राहतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एक मोठी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा १७ टक्के आहे, असे सांगून ते म्हणाले की, आपल्याला मान्सूनबाबत सतर्क राहावे लागेल.

रुपया

रुपयाच्या घसरणीबाबत मल्होत्रा म्हणाले की, मजबूत डॉलर आणि वाढती जागतिक अनिश्चितता असूनही इतर चलनांच्या तुलनेत देशांतर्गत चलनाची कामगिरी स्थिर आहे. पश्चिम आशियातील युद्धानंतर डॉलर मजबूत झाला आहे. अनेक देशांची चलने कमकुवत झाली आहेत. जागतिक दृष्टिकोनातून पाहिले तर भारताच्या रुपयाची स्थिती सामान्य मानली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

एआय

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापराबाबत मल्होत्रा म्हणाले की, सायबर सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेच्या जोखमींविरुद्ध सुरक्षा उपाय सुनिश्चित करत, ग्राहकांची सेवा सुधारण्यासाठी, परिचालन खर्च कमी करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यास प्रोत्साहित केले आहे.

महागाई

महागाईबद्दल संजय मल्होत्रा म्हणाले की, मध्यवर्ती बँकेने आर्थिक वर्ष २०२७ साठी महागाईचा अंदाज आधीच्या ४.६ टक्क्यांवरून वाढवून ५.१ टक्के केला आहे. जून महिन्यात महागाईने रिझर्व्ह बँकेचे ४ टक्क्यांचे मध्यम लक्ष्य ओलांडले. त्याला प्रामुख्याने पुरवठा साखळीतील घटक कारणीभूत होते, असे मल्होत्रा यांनी नमूद केले. मुख्यत्वे अन्नपदार्थ महागल्यामुळे किरकोळ महागाई मे मधील ३.९३ टक्क्यांवरून वाढून जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर पोहोचली.

कर्ज वाढ

कर्ज वाढीबाबत गव्हर्नर म्हणाले की, विविध क्षेत्रांमध्ये पतपुरवठा वाढ व्यापक राहिली आहे. मे मधील १७.५ टक्क्यांच्या तुलनेत जूनमध्ये एकूण बँक पतपुरवठा वार्षिक आधारावर सुमारे १८ टक्क्यांनी वाढला, असे त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in