
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्याजदरात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंट्सनी कपात केली आहे. आता रेपो दर घसरून ६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुमच्या गृह, वैयक्तिक, वाहन कर्ज आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गुरूवारी ही महत्त्वाची घोषणा केली.
आरबीआयच्या नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या चलनविषयक धोरण समिती(MPC)च्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केल्याची माहिती दिली आहे. ही बैठक ७ एप्रिल रोजी सुरू झाली होती. २०२५ मध्ये सलग दुसऱ्यांदा आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात करत प्रमुख व्याजदर ६.२५% केला होता. मे २०२० नंतरची म्हणजे पाच वर्षांनंतरची ही पहिली दर कपात होती.
जीडीपी वाढीचा अंदाज केला कमी
एमपीसीने २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. २०२५-२६ मध्ये किरकोळ महागाई ४ टक्के राहण्याची अपेक्षा आहे, असे एमपीसीने म्हटले आहे. यावेळी बोलताना आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक आर्थिक तणाव आणि व्यापार युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, ट्रंम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांदरम्यान रेपो रेटमध्ये कपात करण्याचं रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.