ऑनलाइन कर्जाच्या गुन्ह्यांमध्ये घट! ४७ टक्क्यांनी फसवणूक कमी झाल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून जाहीर

कर्जाची परतफेड केल्यानंतरही तिला धमक्यांचे फोन सुरू होते. कर्जाची पुनर्प्राप्ती करणाऱ्या एजंटने नंतर तिचे मॉर्फ केलेले...
ऑनलाइन कर्जाच्या गुन्ह्यांमध्ये घट! ४७ टक्क्यांनी फसवणूक कमी झाल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून जाहीर

सोमेंद्र शर्मा

अलीकडेच राज्य परिवहन विभागात काम करणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेची कर्ज देणाऱ्या ॲॅपच्या माध्यमातून फसवणूक झाली होती. या महिलेने हे ॲॅप ओपन केल्यानंतर तिच्या खात्यात काही रक्कम जमा झाली होती. मात्र कर्जाची परतफेड केल्यानंतरही तिला धमक्यांचे फोन सुरू होते. कर्जाची पुनर्प्राप्ती करणाऱ्या एजंटने नंतर तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो तिच्या वडिलांच्या फोनवर पाठवले. अशाप्रकारे कर्ज देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले होते. मात्र यंदा कर्जाच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये तब्बल ४७ टक्क्यांनी घट झाल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत कर्ज देऊन फसवणूक केल्याच्या तब्बल २६ तक्रारी मुंबई पोलिसांकडे जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत तब्बल ४९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या फोनवर लोन ॲॅप डाऊनलोड केले होते. त्यात तिने आपला मोबाईल क्रमांक, बँक खात्याचे तपशील तसेच फोन गॅलरी वापरण्याची परवानगी दिली होती. काही वेळानंतर तिच्या खात्यात ३६०० रुपये जमा झाले. त्यानंतर काही दिवसांनी तिला कर्जाच्या परतफेडीसाठी एजंटकडून फोन येऊ लागले. कर्जाची परतफेड केल्यानंतरही तिचा पैसे परत करण्यासाठी मानसिक छळ होऊ लागला. तिला संशय येऊ लागल्यानंतर या ॲॅपविषयी माहिती घेतली असता, हे ॲॅप बोगस असल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने हे ॲॅप डिलिट केले.

काही दिवसांनी त्याच एजंटने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. तक्रारदार महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७-अ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तत्पूर्वी, मुंबई पोलिसांनी लोन ॲॅपपासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली होती. “कोणतेही ॲॅप डाऊनलोड करण्याआधी त्याची विश्वासार्हता तपासून पाहा. ॲॅपवरून कर्ज घेताना अर्टी-शर्थी तपासून पाहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, अथवा फॉर्म भरू नका. तसेच पैसे स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करू नका आणि लोन ॲॅपवर केवायसी कागदपत्रे शेअर करू नका,” असे मुंबई पोलिसांच्या पत्रकात म्हटले होते. याच कारणामुळे राज्यातील जनता सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक झाली असून ऑनलाइन कर्ज देऊन फसवणूक करण्याच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

२०२३मधील प्रकरणे

२६ गुन्ह्यांची नोंद

५ प्रकरणांचा उलगडा

५ आरोपींना अटक

२०२२मधील प्रकरणे

४९ गुन्ह्यांची नोंद

२ प्रकरणांचा उलगडा

३ आरोपींना अटक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in