रिलायन्स इंडस्ट्रीज सेन्सहॉकसोबत ७९.४ टक्के हिस्सा खरेदी करणार

कराराच्या वृत्तानंतर शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्समध्ये एक टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज सेन्सहॉकसोबत ७९.४ टक्के हिस्सा खरेदी करणार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवारी अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी सेन्सहॉकसोबत निर्णायक कराराची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सेन्सहॉकमधील ७९.४ टक्के हिस्सा ३२ दशलक्ष डॉलर्समध्ये (सुमारे २५५ कोटी रुपये) विकत घेण्याचा करार झाला आहे. ही खरेदी दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. कंपनीने याबाबतची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ही माहिती मंगळवारी शेअर बाजाराला दिली. या कराराच्या वृत्तानंतर शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्समध्ये एक टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. सकाळी रिलायन्स कंपनीचे शेअर्स ०.९४ टक्क्याच्या उसळीसह २५९३.९५ रुपये होते.

कंपनी सौरऊर्जानिर्मितीशी संबंधित व्यवस्थापन साधने डिझाइन करते

सेन्सहॉकची स्थापना २०१८ साली झाली. ही कॅलिफोर्निया-आधारित कंपनी सौरऊर्जा निर्मितीशी संबंधित सॉफ्टवेअर-आधारित व्यवस्थापन साधने विकसित करते. सेन्सहॉक सौरऊर्जा कंपन्यांची प्रक्रिया सोपी करून, नियोजन करण्यापासून ते सौरऊर्जेच्या उत्पादनाला गती देण्यापर्यंत काम करते. कंपनी एंड टू एंड सोलर अॅसेट लाइफसायकल व्यवस्थापित करण्यासाठी सौर डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवारी जाहीर केले आहे की, आर्थिक वर्ष २०२१-२२, आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये कंपनीची उलाढाल अनुक्रमे २,३२६,३६९ डॉलर्स, १,१६५,९२६ डॉलर्स आणि १,२९२,०६३ डॉलर्स होती.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)चे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या कराराबद्दल सांगितले की, या क्षेत्रातील नवीन ऊर्जा क्षेत्रातील सेन्सहॉक सारख्या कंपन्यांमध्ये कंपनीच्या गुंतवणुकीमुळे एक प्रकारचा ताळमेळ निर्माण होईल आणि त्यामुळे ग्राहकांना अधिक मूल्यवान सेवा मिळतील. या संपादनाच्या लक्ष्याशी संबंधित माहिती आणि त्याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ५ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या मीडिया प्रकाशनातदेखील सामायिक केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in