५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर

गौतम अदानी यांच्या अदानी इंटरप्राइजेस लिमिटेड आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या सहभागी झाल्या होत्या
 ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर

गेल्याकाही दिवसांपासून सुरू असलेल्या ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावादरम्यान स्पेक्ट्रमसाठी जवळपास १,५०,१७३ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ‘५ जी’ साठी सर्वाधिक ८८०७८ कोटी मोजले आहेत. कंपनीने २४७४० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने ४३०८४ कोटी रुपये मोजून १९८६७ मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम विकत घेतले. अडाणी डेटा नेटवर्क्सने २१२ कोटी खर्च करून ४०० मेगाहर्टझ तर वोडाफोन-आयडियाने १८७८७ कोटी रुपये खर्च करून २६६८ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम विकत घेतले.

५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ, सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेल, गौतम अदानी यांच्या अदानी इंटरप्राइजेस लिमिटेड आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. गेल्यावर्षी ४जी स्पेक्ट्रमच्या लिलावावेळी जवळपास ७७,८१५ कोटी रुपयांची बोली लागली होती. तर यावर्षी ५जी स्पेक्ट्रमसाठी दुप्पट बोली लावण्यात आली आहे. वर्ष २०१० मध्ये पार पडलेल्या ३जी स्पेक्ट्रमसाठी एकूण ५०,९६८.३७ कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यामुळे ५जी स्पेक्ट्रमसाठी लावण्यात आलेली बोली विक्रमी म्हणता येईल.

५जी स्पेक्ट्रम लिलावादरम्यान जिओने सर्वाधिक किंमतीचे एअरवेव्ह खरेदी केले. त्यानंतर भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा नंबर येतो. ४जी च्या तुलनेत ५जी चा स्पीड १० पट अधिक असेल. सोबतच, लॅग फ्री कनेक्टिव्हिटी मिळेल. ५जी कनेक्टिव्हिटीद्वारे रियल टाइम लाखो डिव्हाइस कनेक्टेड होतील व फास्ट डेटा ट्रान्सफर केला जाईल.

दरम्यान, अदानी समुहाद्वारे २६ Mhz स्पेक्ट्रमसाठी खासगी टेलिकॉम नेटवर्कची सुरुवात करण्यात आली आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओ देशभरात ५जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी काम करत आहेत. तर वोडाफोन आयडिया ठराविक ठिकाणीच ५जी नेटवर्क उपलब्ध करेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in