शरद पवार गटाला दिलासा; ‘तुतारी’ पक्षचिन्ह वापरायला सुप्रीम कोर्टाची परवानगी

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष विभागला गेला आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले.
शरद पवार गटाला दिलासा; ‘तुतारी’ पक्षचिन्ह वापरायला सुप्रीम कोर्टाची परवानगी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने पक्षचिन्ह व पक्ष नावाबाबत सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पक्षाचे नाव व चिन्हाबाबत दिलेल्या निर्देशांमुळे शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारी’ चिन्ह लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास परवानगी दिली आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार’ हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. तर अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना सशर्त अटी घातल्या आहेत.

मंगळवारच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे न्या. सूर्यकांत व न्या. के.व्ही. विश्वनाथ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत की, निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला ते देऊ नये.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष विभागला गेला आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

राज्यसभेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे नाव दिले होते. हे चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत होते, अशी चर्चा होती. पण आता सुप्रीम कोर्टाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी हे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरण्याची मुभा दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला दिलासा देत असताना निवडणूक आयोगाला देखील स्पष्ट आदेश दिले आहेत की, पवार गटाला देण्यात आलेले तुतारी चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देण्यात येऊ नये.

अजित पवार गटाला पक्षचिन्हासाठी काही अटी

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देखील महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले ‘घड्याळ’ हे जरी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असले तरी यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे अजित पवार गटाने यापुढे हे चिन्ह वापरताना तसा उल्लेख करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अजित पवार गट कोणत्याही सभेत, जाहिरातीत, व्हिडिओमध्ये ‘घड्याळ’ चिन्ह वापरेल, तेव्हा त्यांना चिन्हाचा वापर करण्यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, अशी नोट लिहावी लागणार आहे. ही नोट सर्वांना दिसेल अशा पद्धतीने असावी, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, अजित पवार यांच्याकडे असलेले ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in