प. बंगालला ‘रेमल’चा तडाखा, ६ ठार, मुसळधार पाऊस, मालमत्तेचे नुकसान

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाने रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवरून अंतर्गत भागात प्रवेश केला. चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्वेकडील राज्यांसह बांगलादेशमध्ये जोरदार पाऊस झाला आणि अद्यापही तो सुरूच आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र Pixabay
Published on

कोलकाता : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाने रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवरून अंतर्गत भागात प्रवेश केला. चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्वेकडील राज्यांसह बांगलादेशमध्ये जोरदार पाऊस झाला आणि अद्यापही तो सुरूच आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा आणि मालमत्तेचे नुकसान झाले. प. बंगालमध्ये वादळामुळे ६ जण मरण पावले असून अनेक जण जखमी झाले आहेत. बांगलादेशमध्ये १० जणांचा बळी गेला. मात्र, वादळाची आगाऊ सूचना मिळून वेळीच केलेल्या उपाययोजनेमुळे अनेकांचा जीव वाचवण्यात यश आले. चक्रीवादळाच्या तडाख्यापूर्वी पश्चिम बंगाल सरकारने एक लाखाहून अधिक लोकांना आणि बांगलादेशने ८ लाख लोकांना असुरक्षित भागातून सुरक्षित स्थळी हलवले होते. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २१ तासांसाठी स्थगित ठेवल्यानंतर सोमवारी सकाळी कोलकाता विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले.

मध्य कोलकातामधील एंटली येथील बिबीर बागान परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या अविरत पावसामुळे भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. तर सुंदरबन डेल्टाला लागून असलेल्या नामखानाजवळील मौसुनी बेटातील एका वृद्ध महिलेचाही सोमवारी सकाळी मृत्यू झाला. तिच्या झोपडीवर एक झाड कोसळले होते.

रविवारी रात्री ८.३० वाजता रेमल चक्रीवादळ प. बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यांवरील सागर बेट आणि खेपुपाडा यांच्या दरम्यान जमिनीवर धडकण्यास सुरुवात झाली. ही प्रक्रिया (लँडफॉल) चार तास चालली. त्यावेळी प. बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर ताशी १३० ते १५० किमी वेगाने वारे वाहत होते. कोलकाता शहरात वाऱ्याचा कमाल वेग ७४ किमी प्रतितास होता, तर शहराच्या उत्तरेकडील भागात दमदम येथे वाऱ्याचा कमाल वेग ९१ किमी प्रतितास नोंदवला गेला. दोन्ही देशांच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होत होता. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी पहाटे ५.३० या कालावधीत कोलकात्यात १४६ मिमी पावसाची नोंद झाली. चक्रीवादळामुळे दिघा, काकद्वीप आणि जयनगर सारख्या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. दक्षिण बंगालमधील हल्दिया येथे ११० मिमी, तामलुक येथे ७० मिमी आणि निम्पिथ येथे ७० मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसाने घरे, शेतजमिनी आणि पिकांचे नुकसान झाले. उत्तर आणि दक्षिण २४ परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे.

कोलकाता तसेच किनारी जिल्ह्यांमध्ये गवताच्या झोपड्यांची छते उडाली. झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. त्यामुळे शहराच्या बाहेरील भागांसह राज्याच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. कोलकात्याच्या अनेक भागात पाणी साचले होते. तर सियालदाह टर्मिनल स्थानकावरील उपनगरीय रेल्वे सेवा कमीत कमी तीन तासांसाठी अंशत: बंद राहिल्या. वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६८ झाडे उन्मळून पडली, जवळील सॉल्ट लेक आणि राजारहाट भागात अतिरिक्त ७५ झाडे तोडण्यात आली.

हवामान कार्यालयाने सांगितले की, सोमवारी पहाटे ५.३० वाजल्यानंतर चक्रीवादळ कमकुवत झाले आणि त्याचा भर ओसरत गेला. कॅनिंगच्या सुमारे ७० किमी ईशान्येस आणि मोंगलाच्या पश्चिम-नैऋत्येस ३० किमी. अंतरावर पोहोचताना चक्रीवादळ आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने कोलकाता, नादिया आणि मुर्शिदाबादसह दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आपत्कालीन सेवा, बचाव पथके आणि एनडीआरएफकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रेमल म्हणजे वाळू

या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी बंगालच्या उपसागरातील रेमल हे पहिले चक्रीवादळ आहे. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्याच्या पद्धतीनुसार ओमानने या चक्रीवादळाला रेमल असे नाव दिले. अरबी भाषेत रेमल या शब्दाचा अर्थ वाळू असा होतो.

बांगलादेशात १० बळी

रविवारी रात्री भारतासह बांगलादेशच्या किनारपट्टीवरही रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळाने बांगलादेशात १० जण ठार झाले. चक्रीवादळाचा परिणाम प्रामुख्याने बारिसाल, भोला, पटुआखली, सातखीरा आणि चट्टोग्राम या भागांवर झाला आहे. बारिसाल, भोला आणि चट्टोग्राममध्ये पाच जण ठार झाले. पटुआखलीमध्ये एक व्यक्ती आपल्या बहिणीला आणि मावशीला आश्रयस्थानी आणण्यासाठी घरी परतत असताना वादळाच्या तडाख्यात वाहून गेली. वादळात आडोशासाठी धावत असताना पडून सातखीरा येथे आणखी एकाचा मृत्यू झाला. मोंढा येथे ट्रॉलर बुडाल्याने एका मुलासह दोन जण बेपत्ता झाले आहेत. ग्रामीण वीज प्राधिकरणाने 'रेमल'चे नुकसान कमी करण्यासाठी किनारपट्टी भागातील १५ दशलक्ष लोकांची वीज खंडित केली आहे. काही भागात १२ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाली आहे.

रविवारी बांगलादेशने असुरक्षित भागातून सुमारे ८ लाख लोकांना बाहेर काढले. स्थलांतरितांना ९००० आश्रयस्थानांमध्ये हलविण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत प्रदेशातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. बांगलादेशने चट्टोग्राममधील विमानतळ बंद केले आणि कॉक्स बाजारला जाणारी उड्डाणे रद्द केली. चितगाव बंदरामधील कामकाजही बंद केले होते.

logo
marathi.freepressjournal.in