१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा! ओवेसी विरुद्ध नवनीत राणा

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी गुरुवारी ‘एआयएमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा! ओवेसी विरुद्ध नवनीत राणा

हैदराबाद : भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी गुरुवारी ‘एआयएमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. पोलिसांना १५ सेकंदांसाठी कर्तव्यापासून दूर केले, तर ओवेसी बंधूंना ते कोठून आले होते आणि आता ते कोठे गेले याचा थांगपत्ताही लागणार नाही, असा इशारा यावेळी नवनीत राणा यांनी दिला.

पोलिसांना दूर केले तर देशातील हिंदू-मुस्लीम गुणोत्तराचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आपल्याला केवळ १५ मिनिटांचा कालावधी लागेल, असे वक्तव्य २०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले होते. हे वक्तव्य उकरून काढत राणा यांनी ओवेसी बंधूंना प्रति इशारा दिला.

अकबरुद्दीन यांनी केवळ १५ मिनिटांचा अवधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र आम्हाला केवळ १५ सेकंदांचा कालावधी पुरेसा आहे, जर १५ सेकंदांसाठी पोलिसांना दूर केले तर तुम्ही कोठून आला होतात आणि आता कोठे गेला आहात त्याचा थांगपत्ता तुम्हाला लागणार नाही, असे राणा म्हणाल्या. त्यांनी आपल्या वक्तव्याची फीत 'एक्स'वर लोड केली आहे. नवनीत राणा या हैदराबादमधील भाजपचे उमेदवार के. माधवी लता आणि तेलंगणमधील अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आल्या होत्या.

राणा यांना एक तास द्या, आम्ही घाबरत नाही - ओवेसी

राणा यांच्या वक्तव्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांना विचारले असता ते म्हणाले की, राणा यांना एक तासाचा अवधी द्यावा, असे आपण पंतप्रधानांना सांगणार आहोत. मोदींकडे सत्ता आहे, १५ सेकंद द्या, किंवा एक तास द्या, आम्ही घाबरत नाही, दिल्लीत तुमचे पंतप्रधान आहेत, रा. स्व. संघ तुमचा आहे, सर्व काही तुमचे आहे, आम्ही कोठे यावयाचे ते सांगा, आम्ही येऊ, असे ओवेसी यांनी पत्रकारांना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in