रघु राय गेले...

भारताच्या बदलत्या स्वरूपाचे आणि इथल्या लोकांच्या भावविश्वाचे आपल्या लेन्सद्वारे दर्शन घडवणारे प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांचे रविवारी पहाटे येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
रघु राय गेले...
रघु राय गेले...
Published on

नवी दिल्ली : भारताच्या बदलत्या स्वरूपाचे आणि इथल्या लोकांच्या भावविश्वाचे आपल्या लेन्सद्वारे दर्शन घडवणारे प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांचे रविवारी पहाटे येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

१८ डिसेंबर १९४२ रोजी झांग, पंजाब (आताचे पाकिस्तान) येथे जन्मलेले राय पेशाने सिव्हिल इंजिनिअर होते. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी छायाचित्रणाला सुरुवात केली आणि १९६६ मध्ये 'द स्टेट्समन' या वृत्तपत्रात मुख्य छायाचित्रकार म्हणून रुजू झाले.

त्यानंतरच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत, राय यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अत्यंत स्पष्टतेने दस्तऐवजीकरण केले. हेन्री कार्टियर-ब्रेसन यांचे शिष्य असलेल्या राय यांनी आधुनिक भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना टिपल्या, ज्यात १९७२ मधील बांगलादेश निर्वासित संकटापासून ते १९८४ ची भोपाळ गॅस दुर्घटनेपर्यंत असंख्य घटना त्यांनी फोटोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवल्या. यांचा समावेश आहे.

इंदिरा गांधी, दलाई लामा, मदर तेरेसा, सत्यजित राय, हरिप्रसाद चौरसिया आणि बिस्मिल्ला खान यांसारख्या दिग्गज व्यक्तींची त्यांनी टिपलेली पोर्ट्रेट्स त्यांच्या जीवनातील अज्ञात पैलू जगासमोर आणणारी ठरली. केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता, राय यांनी सामान्य माणसाच्या जीवनातील साधे क्षणही तितक्याच संवेदनशीलतेने टिपले. दैनंदिन जीवनातील खडबडीतपणा सौम्य करण्यासाठी की काय, त्यांनी कृष्णधवल छायाचित्रांच्या माध्यमातून साध्या गोष्टींनाही विलक्षण बनवले.

२०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राय म्हणाले होते की, "छायाचित्रणाची सर्वात शक्तिशाली बाजू ही आहे की जीवन आणि निसर्ग सतत बदलत असतो आणि आव्हानात्मक असतो, जो तुम्हाला अंतर्बाह्य हलवून सोडतो."

त्यांची चित्रे भारताच्या सामूहिक स्मृतीमध्ये कोरली गेली आहेत. भोपाळ दुर्घटनेतील एका बाळाचे ते विषण्ण करणारे छायाचित्र ज्याचे डोळे कायमचे उघडे आहेत आणि एक हात त्याला निजेत कुरवाळत आहे हे आजही अंगावर काटा आणते.

१९७२ मध्ये बांगलादेश युद्धाच्या वार्तांकनासाठी त्यांना 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले होते. राय यांनी ५५ हून अधिक पुस्तके लिहिली असून ५७ व्या पुस्तकावर त्यांचे काम सुरू होते.

राहुल गांधी, प्रियांका गांधी, शशी थरूर आणि नवीन पटनायक यांसारख्या राजकीय नेत्यांनी तसेच चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली. रविवारी लोधी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in