प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या ‘माँ’ या कवितेला उर्दू साहित्याच्या जगात वेगळे स्थान आहे. अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर लखनौच्या 'संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स'मध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मुनव्वर राणा यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मात्र, सरकारवर नाराजी व्यक्त करत त्यांनी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. मुनव्वर राणा हे अनेक दिवसांपासून आजारी होते. ते दीर्घकाळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते.

राणा यांच्या इच्छेनुसार सोमवारी लखनौमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांची मुलगी सोमय्या यांनी सांगितले. राणा यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. "त्यांना आजारपणामुळे 14 ते 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना प्रथम लखनौमधील मेदांता आणि नंतर एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले, जिथे रविवारी रात्री 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला", असे त्यांचा मुलगा तबरेज राणाने सांगितले.

मुनव्वर राणा यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 रोजी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे झाला. उर्दू साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. 2014 मध्ये 'शाहदाबा' या कवितेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कविता अतिशय सोप्या शब्दांवर आधारित असायच्या, त्यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले. मुनव्वर राणा यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मान-

त्यांना अमीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉ. झाकीर हुसेन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार यासह अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जगभरात चाहते -

भारतातील प्रसिद्ध कवींमध्ये गणले जाणारे मुनव्वर राणा यांच्या ‘माँ’ या कवितेला उर्दू साहित्याच्या जगात वेगळे स्थान आहे. उर्दू शायरीचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व राहिलेल्या राणा यांच्या शायरी आवडणारे लोक जगभर आहेत. मुनव्वर राणा यांची मंचावरील उपस्थिती विशेष असायची. ‘माँ’ कवितेशिवाय त्यांचे कोणतेही कविसंमेलन कधी पूर्ण झाले नाही. प्रत्येक ठिकाणी या कवितेची आवर्जून मागणी असायची.

logo
marathi.freepressjournal.in