इस्रायली सैन्याची फेरमांडणी

हमासविरुद्ध युद्ध सुरूच राहणार, राखीव सैन्याची पुनर्मांडणी करण्याचा निर्णय.
इस्रायली सैन्याची फेरमांडणी

तेल अवीव : इस्रायलच्या सैन्याने युद्धभूमीवरील सैन्याच्या तैनातीची फेरमांडणी केली असून नवीन वर्षातही हमासविरुद्ध युद्ध सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, गाझा शहरावरील इस्रायलचे हल्ले मंगळवारीही चालू होते.

नववर्षाच्या सुरुवातीला इस्रायलने आजवरच्या लष्करी मोहिमेचा आढावा घेऊन काही फेरमांडणी करण्याचे ठरवले आहे. नवीन ध्येयनिश्चितीला साजेशी सैन्याची तैनाती होत आहे. त्यानुसार सीमेवरील काही भागातील सैन्य मागे घेऊन ते अन्यत्र तैनात केले जाईल. या प्रक्रियेत प्रामुख्याने राखीव सैन्याची पुनर्मांडणी केली जात आहे, अशी माहिती इस्रायलच्या सैन्याचे प्रवक्ते डॅनिएल हगारी यांनी दिली. याशिवाय तूर्तास युद्धबंदीची कोणतीही योजना नसून नवीन वर्षातही युद्ध सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हमास-इस्रायल युद्ध सुरू होऊन आता साधारण तीन महिने होत आहेत. आतापर्यंत इस्रायलने गाझा पट्टीवर अव्याहतपणे बॉम्बहल्ले करून बरीच नासधूस केली आहे. इस्रायलच्या सैन्याने हमासची अनेक भुयारे नष्ट केली आहेत. तसेच हमासचे अनेक दहशतवादीही ठार मारले आहेत. युद्धात गाझा पट्टीतील सुमारे २२ हजार नागरिकांचा जीव गेला आहे. इस्रायलने गाझा पट्टीची दोन भागांत विभागणी केली असून इस्रायलशेजारच्या प्रदेशात बफर झोन तयार करण्याची इस्रायची योजना आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in