
नवी दिल्ली : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा येथे साजरा झाला. कर्तव्य पथावर आयोजित केलेल्या सोहळ्यात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते तिरंगा फडकावला. या सोहळ्याला इंडोनेशियाचे राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्तव्य पथावर सैन्याच्या सामर्थ्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन घडवण्यात आले.
कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तीन सैन्य दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी मान्यवरांची भेट घेतली. उपराष्ट्रपति जगदीप धनखड हे ही कर्तव्य पथ पोहचले. यानंतर राष्ट्रपति मुर्मू यांनी तिरंगा फडकवला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. याचवेळी हेलीकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. अतिमहत्वाच्या व्यक्तींसह कार्यक्षम सरपंच, वस्त्रोद्योगातील कारागीर आणि वन आणि वन्यजीव संरक्षण कार्यकर्ते आदी १० हजार विशेष पाहुण्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत स्वीकारले गेली आणि २६ जानेवारी १९५० रोजी ती लागू झाली. यंदा राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना "स्वर्णिम भारत: परंपरा और विकास" ही होती.
परेडपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या शहीदांना आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर कर्तव्य पथावर भारतीय सैन्याच्या भव्य परेडचा आयोजन केले. ज्यात विविध सैन्य दलांनी आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. या प्रसंगी विविध राज्यांची, संस्कृतींची आणि परंपरा पाहायला मिळाल्या.
परेडची सुरुवात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. ३०० कलाकारांनी वाद्य यंत्र वाजवत परेड काढली. त्यानंतर इंडोनेशियाच्या सैनिकांनी परेड केली. भारतीय सैन्याने भीष्म टँक, पिनाका मल्टी लॉन्चर रॉकेट सिस्टमसह मार्च केला.
तिन्ही सैन्य दलाचा चित्ररथ
या परेडमध्ये पहिल्यांदाच देशाच्या तिन्ही सैन्यांच्या संयुक्त चित्ररथाचे प्रदर्शन केले. यात तिन्ही सैन्य दलातील वाढता समन्वय आणि एकजूटता दर्शवली गेली. यात युद्धभूमीचे दृश्य दाखवण्यात आले. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील एकत्रित ऑपरेशन्ससाठी एक संयुक्त कमांड सेंटरचे प्रदर्शन करण्यात आले.
तिन्ही सैन्यांमधील समन्वय आणखी सुधारण्यासाठी सरकार एकीकृत थिएटर कमांड स्थापन करण्यावर विचार करत आहे.
प्रलय क्षेपणास्त्राचे प्रदर्शन
कर्तव्य पथावर पहिल्यांदाच ‘प्रलय’ क्षेपणास्त्राचे प्रदर्शन करण्यात आले. भारतात डीआरडीओ व आरसीआयने मिळून हे क्षेपणास्त्र बनवले आहे.
विविध राज्यांच्या चित्ररथाचे प्रदर्शन
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशातील १६ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या संस्कृती आणि वारशाचे दर्शन चित्ररथांमधून दिले. गोवा, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, चंदीगढ, दिल्ली, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव आदी राज्यांचे चित्ररथ होते. उत्तराखंडच्या चित्ररथात राज्याची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य व पर्यटन आदी बाबी मांडल्या होत्या. हरयाणा, गोव्याने आपले चित्ररथातून आपल्या राज्याचे दर्शन घडवले.
सामाजिक न्याय खात्याचा चित्ररथ
या परेडमध्ये सामाजिक न्याय खात्याचा चित्ररथ प्रदर्शन करण्यात आले. त्यात आदिवासी विकास आणि भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनदर्शन घडवण्यात आले.
३०० कलाकारांनी सादर केले "सारे जहाँ से अच्छा..." गाणं
कर्तव्यपथावर संचलन सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध भागातून आलेल्या ३०० कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने “सारे जहाँ से अच्छा…” हे गाणं सादर केले. परेड कमांडर लेफ्टनंट जनरल अवनीश कुमार यांनी सलामी दिली.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या तुकडीचा सहभाग
कॅप्टन सूरज सिंह यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या पथकाने परेड केली. हे क्षेपणास्त्र अचूकता व भेदकता यासाठी ख्यातनाम आहे. याचवेळी ‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या तुकडीचे कर्तव्य पथावर संचलन केले.
लढाऊ विमानांचा थरार
या परेडमध्ये भारतीय सैन्याने शौर्याचे दर्शन घडवले. ब्रह्मोस, सुखोई आदींच्या थराराने कर्तव्यपथ थरारला. हवाई दलाच्या ४० विमानांनी यात सहभाग घेतला. यात २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने, ७ हेलिकॉप्टर्स सहभागी झाली होती.
इंडोनेशियन लष्कराचे संचलन
इंडोनेशियन राष्ट्रीय लष्करी दलाच्या वतीने कर्तव्यपथावर संचलन केले. यावेळी इंडोनेशियाच्या विविध लष्कर दलातील १९० अधिकारी, सैनिक उपस्थित होते.