सिक्कीममध्ये अडकलेल्या १२०० पर्यटकांची सुटका

सिक्कीममध्ये स्थानिक भुतिया व लेपचा समाजाचा ‘लसूंग’ हा नववर्षाचा उत्सव बुधवारी साजरा केला जात होता.
सिक्कीममध्ये अडकलेल्या १२०० पर्यटकांची सुटका
PM

नवी दिल्ली : बर्फवृष्टीमुळे पूर्व सिक्कीममध्ये उंचावरील भागात अडकून पडलेल्या बाराशेहून अधिक पर्यटकांची लष्कराने बुधवारी रात्रभर मोहीम राबवून सुटका केली. अडकलेल्या लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अत्यंत अचूकपणे ही मोहीम पार पाडण्यात आली, अशी माहिती गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

सिक्कीममध्ये स्थानिक भुतिया व लेपचा समाजाचा ‘लसूंग’ हा नववर्षाचा उत्सव बुधवारी साजरा केला जात होता. हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक आले होते. त्याचवेळी राज्यातील उंचावरील ठिकाणी बर्फवृष्टी झाली. हवामान बिघडल्यामुळे तसेच बर्फवृष्टीमुळे हे पर्यटक पूर्व सिक्कीममधील विविध ठिकाणी अडकून पडले. पर्यटकांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश आहे. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरने बुधवारी रात्री उशिरापर्यंत अथकपणे या पर्यटकांच्या बचावासाठी मोहीम राबवली. अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच त्यांना निवारा, उबदार कपडे, वैद्यकीय मदत आणि गरम अन्न पुरवण्यात आले. या पर्यटकांना सुरक्षितपणे गँगटोकला पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in