भारतीय नौदलाकडून १९ पाकिस्तानींची सुटका; सोमालियाजवळ आयएनएस सुमित्राची सागरी चाच्यांविरुद्ध कारवाई

आयएनएस सुमित्राने गेल्या ३६ तासांत यशस्वी केलेली ही दुसरी सागरी चाच्यांविरुद्धची मोहीम आहे. याच्या काही तास आधीच आयएनएस सुमित्राने याच परिसरात गस्त घालताना इराणच्या मच्छीमार नौकेवरील १७ खलाशांना वाचविले होते.
भारतीय नौदलाकडून १९ पाकिस्तानींची सुटका; सोमालियाजवळ आयएनएस सुमित्राची सागरी चाच्यांविरुद्ध कारवाई
Published on

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या गस्ती नौकेने मंगळवारी सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांच्या तावडीतून पाकिस्तानच्या १९ कर्मचाऱ्यांची सुटका केली. आयएनएस सुमित्राने गेल्या ३६ तासांत यशस्वी केलेली ही दुसरी सागरी चाच्यांविरुद्धची मोहीम आहे. याच्या काही तास आधीच आयएनएस सुमित्राने याच परिसरात गस्त घालताना इराणच्या मच्छीमार नौकेवरील १७ खलाशांना वाचविले होते.

एडनच्या आखातात, सोमालियाच्या किनाऱ्याजवळ इराणचा ध्वज असलेल्या अल नईमी नावाच्या मासेमारी नौकेवर सोमालियातील ११ चाच्यांनी हल्ला करून त्यावरील १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. या जहाजाकडून पाठवण्यात आलेला मदतीसाठीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्याच परिसरात गस्त घालत असलेल्या आयएनएस सुमित्रावरील भारतीय नौसैनिकांनी तातडीने कारवाई करत जहाजावरील १९ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि चाच्यांना ताब्यात घेतले, असे भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या जहाजाची सुटका

भारतीय नौदलाने मंगळवारी सेशेल्स डिफेन्स फोर्सेस आणि श्रीलंकेच्या नौदलाच्या मदतीने २७ जानेवारी रोजी सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या श्रीलंकेच्या लॉरेंझो पुथो नावाच्या मासेमारी नौकेवरील ६ खलाशांची सुटका केली आणि ३ सागरी चाच्यांना कैद केले. भारतीय नौदलाच्या आयएनएस शारदा या युद्धनौकेने त्यावरील हेल सी-गार्डियन ड्रोन्सचा वापर करून अपहृत जहाजाचा सेशेल्सजवळ माग काढला आणि कारवाई केली. सुटका केलेली नौका सेशेल्समधील माहेच्या दिशेने रवाना केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in