कृत्रिम गर्भ तयार करण्यात संशोधकांना यश; निपुत्रिक दाम्पत्यांच्या आशा पल्लवित

उंदरावरील या संशोधनाची मानवी नैसर्गिक गर्भनिर्मितीच्या संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे
कृत्रिम गर्भ तयार करण्यात संशोधकांना यश; निपुत्रिक दाम्पत्यांच्या आशा पल्लवित
Published on

१० वर्षांच्या अथक संशोधनानंतर संशोधकांना प्रयोगशाळेत उंदराचा कृत्रिम गर्भ तयार करण्यात यश मिळाले आहे. शुक्राणू आणि अंड्याच्या संयुगाशिवाय मूळपेशींपासून (स्टेम सेल्स) बनवलेल्या या गर्भामध्ये मेंदू आणि हृदयासह अन्य अवयव विकसित होत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. उंदरावरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास मूल होत नसलेल्या लाखो दाम्पत्यांच्या आयुष्यात अंकुर फुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘नेचर’ या विज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकात नुकतेच याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

युकेमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सस्तनप्राणी विकास आणि मूळपेशी जीवशास्त्र विभागाचे प्रा. माग्दालेना झर्निका-गोएत्स यांनी सांगितले की, “मूळपेशी या वेगळपणा नसलेल्या पेशी असतात, त्यामुळे त्यांच्यात बदल करून पूर्ण वाढीच्या आणि अवयववाढीसाठी आवश्यक असलेल्या विशेष पेशी तयार करणे शक्य असते. त्यामुळेच आम्ही बनवलेला उंदराच्या गर्भामध्ये केवळ मेंदूच नव्हे, तर धडकणारे हृदयही विकसित होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण विकसित शरीराची निर्मिती करण्यासाठी आवश्यक अवयवही तयार होत आहेत. कृत्रिम गर्भ तयार करण्याचे अनेक वर्षांचे मानवी स्वप्न होते. त्यासाठी गेले दशकभर आम्ही अथक मेहनत घेत होतो. ते स्वप्न आता कुठेतरी सत्यात उतरताना दिसत आहे.” कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील जीवशास्त्राचे प्राध्यापक मरियन ब्रोनर म्हणाले, “मातेच्या गर्भाशिवाय गर्भ विकसित होत असल्याने त्याच्या वाढीची प्रक्रिया पाहणे शक्य होत आहे.

एखाद्या टप्प्यावर गुंतागुंत निर्माण झाल्यास ती का निर्माण झाली आणि त्यावर काय उपचार करायचे, हे पाहणे शक्य होणार आहे. सध्या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत गर्भाचे निरीक्षण करणे शक्य होत नाही.”सध्या उंदराचा गर्भ केवळ आठ दिवसांचा आहे; पण त्याची वाढ समाधानकारक आहे. अद्यापपर्यंत तरी कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही.

उंदरावरील या संशोधनाची मानवी नैसर्गिक गर्भनिर्मितीच्या संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे. जगात लाखो दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही किंवा काही कारणांनी बाळ गमवावे लागते, अशा दाम्पत्यांसाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय, या संशोधनामुळे नैसर्गिक गर्भधारणेतील अडचणी दूर करण्यासही मदत होणार आहे.

- प्रा. माग्दालेना झर्निका-गोएत्स

logo
marathi.freepressjournal.in