आम आदमी पक्षाच्या ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; लोकसभेपूर्वीच केजरीवाल यांना धक्का

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या.
आम आदमी पक्षाच्या ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; लोकसभेपूर्वीच केजरीवाल यांना धक्का

नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाबनंतर तिसऱ्या क्रमांकाचे मोठे समर्थन असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (आप) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकामागून एक झटके मिळू लागले आहेत. गुजरातमध्ये आमदार भूपत भायाणी यांच्या राजीनाम्यानंतर, भरूचमध्ये एकाच वेळी ४० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची साथ सोडली असून सर्वांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे.

गुजरातमधील 'आप' प्रमुख इसुदान गढवी यांना अधिकृत पत्र लिहून मायनॉरिटी विंगचे अध्यक्ष अमजद खान पठान, ३३ पक्ष कार्यकर्ते आणि १० पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनाम्याची घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे, विसावदर मतदारसंघातील आमदार भूपत भायाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सामूहिक राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे भरूचमधील जिल्हाध्यक्ष पीयूष पटेल म्हणाले, राजीनामा देणारे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपासूनच निष्क्रिय होते. यामुळे त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले नाही. एवढेच नाही, तर राजीनाम्यासाठी पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला आहे. ही बाब राज्य नेतृत्वासमोर ठेवली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला सुमारे १३ टक्के मते मिळाली होती. दिल्ली आणि पंजाबनंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला गुजरातमध्येच सर्वाधिक मते मिळाली आहेत. यामुळेच लोकसभा निवडणुकीतही येथून पक्षाला मोठी अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात एका आमदारासह अनेक नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपची साथ सोडत भाजप अथवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in