नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी रेल्वेच्या सेवेतील आपल्या पदांचे दिलेले राजीनामे सोमवारी रेल्वे प्रशासनाने स्वीकारले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर रेल्वेच्या वतीने सोमवारी दोन स्वतंत्र नोटिसा जारी करण्यात आल्या. त्यामध्ये म्हटले आहे की, ६ सप्टेंबर रोजी या दोघांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते ते सक्षम प्राधिकाऱ्यांनी तातडीने मंजूर केले आहेत. पुनिया आणि फोगट यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. फोगट यांना हरयाणातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
उत्तर रेल्वेने पुनिया आणि फोगट यांच्यासाठी तीन महिन्यांच्या नोटिशीची अट शिथील केली आहे. नोटीस कालावधी निकषामुळे फोगट निवडणूक लढविण्यास पात्र होणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र आता राजीनामे स्वीकारले असल्याने फोगट यांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.