संदेशखळीमध्ये पुन्हा हिंसाचार; महिलांची पोलिसांशी झटापट

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या २४ तासांत रविवारी पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये महिला आणि पोलिसांमध्ये पुन्हा चकमक उडाली. पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले.
संदेशखळीमध्ये पुन्हा हिंसाचार; महिलांची पोलिसांशी झटापट
ANI

कोलकाता : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या २४ तासांत रविवारी पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये महिला आणि पोलिसांमध्ये पुन्हा चकमक उडाली. पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले.

संदेशखळी भागातील आगरहाटी गावात स्थानिक महिलांनी रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ)च्या जवानांशी हाणामारी केली. शनिवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींच्या शोधात पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले होते. तेव्हा स्थानिकांनी रस्ता अडवला. त्यानंतर ही झटापट झाली.

आम्ही कोणालाही अटक केलेली नाही, पण स्थानिक महिलांनी विरोध सुरू केला आहे. आमच्या काही महिला सहकारी जखमी झाल्या आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून रस्त्यांवरील बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे बशीरहाट पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. येथे मोठ्या संख्येने आरएएफ, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि पोलीस उपस्थित आहेत, असे अधिकारी म्हणाले.

जानेवारीपासून खदखद

संदेशखळीत ५ जानेवारीपासून संघर्ष सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याने तेथे जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार केला, असे आरोप आहेत. शेख याला अटक करण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला करण्यात आला होता. सुमारे १००० लोकांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले होते. शेख आणि त्याच्या साथीदारांना पश्चिम बंगाल पोलिसांनी २९ फेब्रुवारी रोजी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in