नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतातील अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊण्टबॅटन यांची पत्नी एडविना यांच्यासह अनेक मान्यवरांना लिहिलेली पत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयास परत करावी, अशी मागणी भाजपने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना केली आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज देशाचा आहे, कोणत्या व्यक्तीची ती खासगी मालमत्ता नाही, असा टोला भाजपने काँग्रेसला लगावला.
पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाने (पीएमएमएल) गांधी कुटुंबाला जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे परत करण्याची औपचारिक विनंती केली आहे. ही पत्रे २००८ मध्ये यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांना पाठवण्यात आली होती. ‘पीएमएमएल’चे सदस्य रिझवान कादरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना, सोनिया गांधींकडून मूळ पत्र परत घेण्याची किंवा फोटोकॉपी किंवा डिजिटल प्रती प्रदान करण्याची विनंती केली. यावर्षी सप्टेंबरमध्येही ‘पीएमएमएल’ने सोनिया गांधी यांना पत्र परत करण्याची विनंती केली होती.
जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेली ही पत्रे ऐतिहासिक मानली जातात. ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल’ने १९७१ मध्ये ही पत्रे ‘नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी’कडे (आताचे पीएमएमएल) सुपूर्द केली होती. तथापि, २००८ मध्ये ही पत्रे ५१ पेट्यांमध्ये बंद करून सोनिया गांधींना पाठवण्यात आली होती.
या पत्रसंग्रहात नेहरू यांनी एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत यांसारख्या प्रमुख व्यक्तींसोबत केलेल्या पत्रव्यवहाराचा समावेश आहे.
‘पीएमएमएल’ने गांधी कुटुंबाला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे की, ही पत्रे भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाची अमूल्य माहिती देतात. या कारणास्तव त्यांना संस्थेच्या अभिलेखागारात परत पाठवण्याची मागणी ‘पीएमएमएल’ने केली आहे. या दस्तऐवजांचे नेहरू कुटुंबासाठी वैयक्तिक महत्त्व आहे आणि याची आम्हाला जाण आहे. परंतु या ऐतिहासिक साहित्याचा, अभ्यासक आणि संशोधकांना खूप फायदा होईल, असा विश्वास ‘पीएमएमएल’ला आहे.
‘पीएमएमएल’ने पत्रे परत मागितल्यानंतर भाजपने गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, मला विशेष मनोरंजक वाटते ते म्हणजे नेहरूजींनी एडविना माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रात असे काय आहे जे लपवले जात आहे.