
इम्फाळ : मणिपुरात लुटलेली किंवा अवैध शस्त्रास्त्रे येत्या सात दिवसांत परत करावीत, असे आवाहन राज्यपाल अजय भल्ला यांनी केले आहे.
राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर राज्यपालांनी जनतेला हे आवाहन केले. मणिपुरात मे २०२३ पासून हिंसाचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे.
राज्यपाल भल्ला म्हणाले की, गेल्या २० महिन्यांपासून राज्यातील जनतेला मोठा त्रास होत आहे. राज्यातील सर्वच जाती-धर्माच्या जनतेला अपील करतो की, लुटलेली व अवैध शस्त्रास्त्रे येत्या सात दिवसांत जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सुरक्षा दलाच्या तळावर परत करावीत. ही शस्त्रास्त्रे परत करणे हे शांतता प्रस्थापित करण्याचा एक भाग असू शकते.
शस्त्रास्त्रे परत न केल्यास कारवाई
निर्धारित वेळेत ही शस्त्रास्त्रे परत केल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, त्यानंतर कोणाकडे शस्त्रास्त्रे सापडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा भल्ला यांनी दिला.