राहुल यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे इनाम देऊ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी विधान केले असून त्याबद्दल त्यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
राहुल यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे इनाम देऊ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
@sanjaygaikwad34/ X
Published on

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी विधान केले असून त्याबद्दल त्यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचे इनाम देण्यात येईल, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. मात्र गायकवाड यांच्या वक्तव्याला आपला पाठिंबा नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील आरक्षण पद्धत आपल्याला रद्द करावयाची आहे, असे विधान राहुल गांधी यांनी परदेशात केले होते. त्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे संजय गायकवाड यांनी ११ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यापूर्वी म्हटले होते. गांधी यांचे विधान जनतेचा विश्वासघात आहे. मराठा, धनगर आणि इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी लढा देत असताना त्यापूर्वीच गांधी यांनी आरक्षणच रद्द करण्याची भाषा केली आहे, असे गायकवाड म्हणाले. . राहुल गांधी यांन संविधान दाखवून भाजपला संविधान बदलावयाचे असल्याची भाषा केली होती. मात्र देशाला ४०० वर्षे मागे नेण्याचे काँग्रेसचेच मनसुबे असल्याचेही ते म्हणाले.

बावनकुळेंचे कानावर हात

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत कानावर हात ठेवले आहेत. गायकवाड यांच्या वक्तव्याला आपला पाठिंबा नसल्याचे ते म्हणाले. मात्र पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, प्रगतीला खीळ बसेल असे विधान करून आरक्षणाला विरोध केला होता, हे आम्ही विसरू शकत नाही, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शिंदेजी, वाचाळवीर गायकवाडांना वेळीच आवरा पटोलेंची मागणी

दरम्यान, ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडांनी आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहात आहे, असे द्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भाजपचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो, तर दुसरा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतो आणि याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मूग गिळून गप्प बसतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, असेही पटोले यांनी म्हटले आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी गायकवाड यांच्या तोंडाला लगाम घालावा, अन्यथा पंजा काय करेल हे कळणारही नाही. राहुल गांधी आणि संविधान यावर बोलण्याची तुमची लायकी आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in