
देशाच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीत पुन्हा वाढ झाली असून ती पुन्हा ६०० अब्ज डालर्सच्या पुढे गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, २७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळी ३.८५४ अब्ज डॉलर्सने वाढून ६०१.३६३ अब्ज डॉलर्स झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली होती आणि ती ४.२३० अब्ज डॉलर्सनी वाढून ५९७.५०९ अब्ज डॉलर्स झाली होती. अहवालानुसार, एकूण चलन साठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परकीय चलन मालमत्तेत (एफसीए) वाढ झाल्यामुळे एकूण वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, एफसीए २७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ३.६१ अब्ज डॉलर्सने वाढून ५३६.९८८ अब्ज डॉलर्स झाली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील सोन्याचा साठा ९४ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४०.९१७ अब्ज डॉलर्स झाला आहे. याशिवाय,आयएमएफकडे जमा केलेला एसडीआर रिपोर्टिंग आठवड्यात १३२ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.४३८ अब्ज डॉलर्स झाला आहे.