पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दलाने (राजद) सोमवारी १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यापैकी पाच जण ‘इंडिया’ आघाडीतील सहयोगी पक्षांच्या उमेदवारांविरुद्ध लढणार आहेत. ही यादी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधीच प्रसिद्ध करण्यात आली.
राजदच्या प्रमुख उमेदवारांमध्ये तेजस्वी यादव (राघोपूर), आलोक मेहता (उजियारपूर), मुकेश रोशन (महुआ) आणि अख्तरुल इस्लाम शाहीन (समस्तीपूर) यांचा समावेश आहे. हे सर्व नेते आपापल्या विद्यमान जागांवरून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
राजद अध्यक्ष लालू प्रसाद यांचे निकटवर्तीय भोला यादव, ज्यांनी २०१५ मध्ये बहादुरपूर मतदारसंघ जिंकला होता, पण नंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूच्या हाती ती जागा गेली. ते पुन्हा मंत्री मदन सहानी यांच्या विरोधात ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी, ज्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत जदयूच्या नवोदित उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला, त्यांना सिवान या त्यांच्या विद्यमान विधानसभा जागेतून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. हिंदू धर्मग्रंथांवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले माजी शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनाही त्यांच्या विद्यमान मधेपुरा जागेतून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
पक्षाच्या "एमवाय" (मुस्लिम-यादव) मतदारआधाराला लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली असली तरी इतर मागासवर्गीय आणि सवर्णांनाही संधी देण्यात आली आहे.
मुख्य विरोधी पक्ष म्हणून राजदला अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे त्यांनी २१ महिला उमेदवारांना तिकिटे दिली आहेत जे त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा, जदयू आणि भाजपपेक्षा, अधिक आहे.
सत्ताधारी एनडीएचे दोन प्रमुख घटक - जदयू आणि भाजप - प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उतरवणार आहेत.
सत्ताकाळात ‘जंगलराज’ आणल्याचा आरोप होणाऱ्या राजदने या वेळेस प्रतिमा बदलण्यापेक्षा वास्तववादी राजकारणाला प्राधान्य दिले आहे. मतिहानी येथून बोगो सिंग हे निवडणूक लढवत आहेत. उसामा शहाब यांना त्यांच्या दिवंगत वडिलांचा, मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची संधी देण्यात आली आहे.
ते सिवान लोकसभा मतदारसंघातील रघुनाथपूर येथून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
माजी खासदार वीणा देवी, या गुंड ते राजकारणी असा प्रवास केलेल्या सूरजभान सिंह यांच्या पत्नी आहेत. त्या आपल्या पतीचे कट्टर प्रतिस्पर्धी अनंत सिंग यांच्या विरोधात मोकामा येथे उतरल्या आहेत.
लंडनमधून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या नवोदित शिवानी शुक्ला या लालगंज येथून निवडणूक लढवत आहेत. या जागेवर तिचे वडील मुन्ना शुक्ला (उत्तर बिहारमधील एक कुख्यात गुंड नेते) दोनदा आणि आई अनु शुक्ला एकदा विजयी झाले होते.