Video : एकाच विमानातून नितीश-तेजस्वी दिल्लीला रवाना; NDA-INDIA दोन्हीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

सत्तास्थापनेबाबत आज दिल्लीत एनडीएची बैठक होणार असतानाच इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे.
Video : एकाच विमानातून नितीश-तेजस्वी दिल्लीला रवाना; NDA-INDIA दोन्हीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून आता दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकहाती बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला यश आलेले नाही. मात्र, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूसारख्या पक्षांमुळे मोदी सरकारने तिसऱ्यांदा सरकार स्थापनेकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीच्याही सत्तास्थापनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सत्तास्थापनेबाबत आज दिल्लीत एनडीएची बैठक होणार असतानाच इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काही वेळात दिल्लीत पोहोचणार आहेत. दुसरीकडे नितीश कुमारांचे माजी सहकारी आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे दोघेही नेते एकाच विमानाने दिल्लीत पोहोचत आहेत.

दोन्ही नेते सकाळी १०.४० वाजताच्या विस्तारा कंपनीच्या UK-718 विमानाने दिल्लीला रवाना झाले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला असून दोन्ही नेत्यांचे आसन देखील एकमेकांच्या मागे-पुढेच असल्याचे दिसते. एनडीएची बैठक दुपारी ३.३० वाजता होणार आहे तर इंडिया आघाडीची बैठक संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. दोघांचे विमानातील फोटो चांगलेच व्हायरल झाले असून नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमध्ये एनडीएला ३० जागा -

बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांना प्रत्येकी १२ जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएचा सहयोगी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना ५ आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाला १ जागा मिळाली आहे. तर, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) ४ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेसला तीन तर डाव्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. पूर्णियाची जागा अपक्ष पप्पू यादव यांच्याकडे गेली आहे.

जेडीयू, टीडीपीशी संपर्क साधण्याबाबत आज निर्णय घेणार - राहुल गांधी

केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जेडीयू आणि टीडीपी यासारख्या माजी सहकाऱ्यांशी संपर्क साधावयाचा की नाही, याबाबतचा निर्णय बुधवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. माजी सहकाऱ्यांशी संपर्क साधणार का, असा प्रश्न गांधी यांना विचारण्यात आला होता.

आमच्या सहकारी पक्षांशी चर्चा केल्याविना आम्ही या घडीला काहीही सांगू शकत नाही, आमची आघाडी बुधवारी निर्णय घेईल आणि जो निर्णय होईल त्यानुसार आम्ही पावले उचलू, असेही गांधी म्हणाले. ही निवडणूक घटनेचे रक्षण करण्यासाठी होती आणि देशातील गरीब आणि मागासवर्ग जनतेने घटनेच्या रक्षणासाठी साथ दिली, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in