’एनडीए‘तून रालोजपा बाहेर

बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येत असतानाच राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (रालोजपा) मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवून एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
’एनडीए‘तून रालोजपा बाहेर
Published on

नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येत असतानाच राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (रालोजपा) मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवून एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी, आम्ही एनडीएमधून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. आता आमचा आणि एनडीएचा काहीही संबंध नाही. असे म्हणत त्यांनी नितीशकुमार सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीशकुमार सरकार हे दलितविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.

पशुपती पारस म्हणाले की, आता आमचा आणि एनडीएचा काहीही संबंध नाही. आजपासून आम्ही एनडीएसोबत असणार नाही. २०१४ पासून आम्ही एनडीएचे विश्वासू मित्रपक्ष होतो. पण आता आम्हाला ही गोष्टदेखील लक्षात घ्यावी लागेल की, जेव्हा लोकसभा निवडणूक होते, तेव्हा आमचा दलित पक्ष असल्याने आमच्यावर प्रत्येकवेळी अन्याय होतो. जर महाआघाडीने आम्हाला योग्य सन्मान दिला तर भविष्यातील राजकारणाबाबत विचार करू, असेही ते यावेळी म्हणाले.

सर्व मतदारसंघांत तयारी

आम्ही राज्यातील सर्व २४३ मतदारसंघांत निवडणुकीची तयारी करणार आहोत. पक्षाचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन पक्षसंघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य सन्मान देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित झाले नाही. मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे पशुपतीकुमार पारस यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in