नवी दिल्ली : दिल्लीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच शुक्रवारी सकाळी मनसोक्त बरसून वरुणराजाने दिल्लीकरांची दाणादाण उडवून दिली. दिल्लीत १९३६ नंतर प्रथमच एका दिवसात इतका सर्वाधिक पाऊस पडला. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा बोजवारा उडाला आणि अनेक वाहने साचलेल्या पाण्यात बुडाली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले, तर काही खासदारांच्या घरातही पाणी शिरले. द्वारका आणि जंगपुरा यासह अनेक ठिकाणी वीजही गायब झाली होती.
शुक्रवार सकाळपासूनच पावसाने दिल्लीकरांची त्रेधातिरपीट उडविली. टर्मिनल १ वरून होणारी विमानांची उड्डाणे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. दिल्लीकर अनेक ठिकाणी अडकून पडले होते. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आणि महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांचे अतोनात हाल झाले.
प्रगती मैदानाजवळील बोगद्यासह अनेक बोगदे बंद करण्यात आले, तर काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकारही घडले. पहिल्याच पावसात हौस खास, दक्षिण विस्तार आणि मयुर विहार येथे घरांमध्ये पाणी शिरले.
शहरातील मुख्य वेधशाळेने सफदरजंग येथे २२८.१ मिमी पावसाची नोंद केली. त्याचप्रमाणे लोधी मार्ग येथील मौसम भवनमध्ये १९२.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
विमान उड्डाणे स्थगित
टर्मिनल १ वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची उड्डाणे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली व प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. परिस्थितीवर आपण जातीने लक्ष ठेवून असल्याचे नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितले. टर्मिनल १ वरून इंडिगो आणि स्पाइसजेटची देशांतर्गत विमानसेवा सुरू असते. अपघातानंतर दिल्ली अग्निशमन सेवा, एनडीआरएफ, डीडीएमए, नागरी संस्था, पोलीस आणि अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी वेगाने मदतकार्य सुरू केले आहे.
छत कोसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती
दिल्ली विमानतळावरील टर्मिनल १ चे छत कोसळले. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने (डायल) एक तांत्रिक समिती स्थापन केली असून ही समिती लवकरात लवकर आपला अहवाल सादर करणार आहे. मुसळधार पावसामुळे छत कोसळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे ‘डायल’ने म्हटले आहे.