

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने इंग्लंडस्थित शस्त्र सल्लागार संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात उद्योजक रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हे पुरवणी आरोपपत्र विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
वड्रा यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे दुसरे मनी लाँड्रिंग आरोपपत्र आहे. यापूर्वी यंदा जुलैमध्ये हरयाणातील शिकोहपूर जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातही ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.
भंडारी यांची प्रत्यार्पणाची विनंती इंग्लंड येथील न्यायालयाने फेटाळल्यानंतर, जुलैमध्ये दिल्ली न्यायालयाने त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.