अहमदाबाद : दिल्ली विमानतळावरील छत कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुसळधार पावसामुळे गुजरातमधील राजकोट विमानतळावरही छत कोसळले आहे. राजकोटच्या हिरासरमध्ये एका वर्षापूर्वी हे विमानतळ उभारण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
दिल्लीप्रमाणेच गुजरातच्या काही भागांना मुसळधार पावसाने शनिवारी झोडपून काढले. त्यामुळे राजकोटच्या विमानतळावर ही घटना घडली. छतावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळाच्या ज्या भागात छत कोसळले, तेथे प्रवाशांची पिक-अप आणि ड्रॉप व्यवस्था आहे, मात्र घटना घडली तेव्हा त्या परिसरामध्ये सुदैवाने कोणीही नव्हते. जून २०२३ मध्ये विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले होते आणि जुलैमध्ये तेथे सेवा सुरू करण्यात आली होती.