भारत कधीही राष्ट्र नव्हते! द्रमुक नेते खासदार ए. राजा यांच्या विधानावरून वादंग

भारत हे कधीही राष्ट्र नव्हते, तो उपखंड आहे. जेथे विविध प्रथा आणि संस्कृतींचे माहेरघर आहे. एक राष्ट्र ‘एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती’ दर्शवते आणि केवळ अशा वैशिष्ट्यांनी एक राष्ट्र बनते...
भारत कधीही राष्ट्र नव्हते! द्रमुक नेते खासदार ए. राजा यांच्या विधानावरून वादंग

चेन्नई/ नवी दिल्ली : भारत हे कधीही राष्ट्र नव्हते, तो उपखंड आहे. जेथे विविध प्रथा आणि संस्कृतींचे माहेरघर आहे. एक राष्ट्र ‘एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती’ दर्शवते आणि केवळ अशा वैशिष्ट्यांनी एक राष्ट्र बनते, असे वादग्रस्त वक्तव्य द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी मंगळवारी केले. त्यांनी केलेल्या या विधानावर, तसेच श्रीराम, भारतमाता यासंबंधातील वक्तव्यावर आता जोरदार वाद पेटला आहे. भाजपने या विधानांवरून राजा यांच्या अटकेची मागणी केली, तर काँग्रेसनेही या विधानावर १०० टक्के असहमती व्यक्त केली आहे.

द्रमुकने आयोजित केलेल्या एका बैठकीत त्यांनी हे विधान केले. त्या संबंधातील व्हायरल व्हिडीओमध्ये ते बैठकीत भाषण करताना दिसत आहेत. त्यात राजा म्हणतात, येथे तामिळ एक भाषा आणि एक देश आहे. मल्याळम एक भाषा आणि एक देश आहे. ओरिया एक राष्ट्र आणि एक भाषा आहे. अशा सर्व राष्ट्रीय वंशांनी भारताची रचना बनली आहे. त्यामुळे, भारत हा एक देश नाही, हा एक उपखंड आहे, ज्यामध्ये विविध प्रथा, परंपरा आणि संस्कृती आहेत.

प्रभू श्रीराम यांनाही ए. राजा हे मानत नाहीत. ते म्हणतात, जर तुम्ही म्हणाल हाच तुमचा देव आणि भारतमाता की जय, तर आम्ही ते देव आणि भारतमाता कधीच स्वीकारणार नाही. त्यांना सांगा, आम्ही सर्व रामाचे शत्रू आहोत. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही. राजा यांनी भगवान हनुमानाची तुलना माकडाशी केली आणि ‘जय श्री राम'चा नारा घृणास्पद असल्याचेही राजा यांनी म्हटले आहे.

द्रमुककडून अव्याहतपणे द्वेषयुक्त भाषणे - भाजप

राजा यांच्या या विधानावर भाजपच्या आयटी विंगचे प्रभारी, अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, द्रमुककडून द्वेषयुक्त भाषणे अव्याहतपणे सुरू आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माचा नायनाट करण्याच्या आवाहनानंतर, आता ए. राजा आहेत जो भारताच्या बाल्कनीकरणाची हाक देत, भगवान रामाची खिल्ली उडवत, मणिपुरींवर निंदनीय टिप्पणी करत आहेत. एक राष्ट्र म्हणून ते भारताच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. मात्र, काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीचे भागीदार शांत आहेत. राहुल गांधी हे त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांचे मौन बोलके आहे.

काँग्रेसकडूनही निषेध

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना ए. राजा यांच्या वक्तव्यावर आपण १०० टक्के असहमत असल्याचे सांगितले, तसेच त्यांच्या विधानांचा मी निषेध करते, असे स्पष्ट केले. रामाबद्दल केलेल्या विधानासंबंधातही त्या म्हणाल्या की, राम सर्वांचा आहे. राम हा समाज, धर्म आणि जातीच्या वरचा आहे, असे माझे मत आहे.

ते त्यांचे वैयक्तिक मत - तेजस्वी यादव

राजा यांनी 'जय श्री राम' आणि भारताच्या कल्पनेवर केलेल्या टिप्पणीनंतर, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले की, द्रमुक नेत्याचे हे विधान वैयक्तिक आहे. ते विधान हे भारताच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधीत्व करीत नाही. ते इंडिया आघाडीशी संबंधित नाहीत, असेही यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in