
नवी दिल्ली : वक्फ विधेयकावरील संसदीय समितीच्या बैठकीला मंगळवारी वेगळेच वळण लागले आणि त्यानंतर बैठकीतच तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे संतप्त झाले आणि त्यांनी बैठकीतच काचेची पाण्याची बाटली फोडली आणि ती अध्यक्षांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्याण बॅनर्जी यांना संसदीय समितीतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
वक्फ (सुधारणा) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत बॅनर्जी अतिशय संतप्त झाले आणि त्यांनी काचेची पाण्याची बाटली फोडून ती अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने भिरकावली. या बैठकीतच बॅनर्जी आणि भाजपचे अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि बॅनर्जी यांचा संयम सुटला. फोडलेली बाटली अध्यक्षांच्या दिशेने भिरकावताना बॅनर्जी यांच्या अंगठ्याला आणि करंगळीला जखम झाली. त्यामुळे त्यांच्यावर प्रथमोपचार करावे लागले.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी बॅनर्जी यांचे एका दिवसासाठी निलंबन करावे, असा ठराव मांडला. त्यावर ९-८ असे मतदान झाले. बॅनर्जी यांनी अध्यक्षांना उद्देशून वापरलेली भाषा आणि फोडलेली बाटली अध्यक्षांच्या दिशेने भिरकावल्याबद्दल त्यांच्या निलंबनाचा ठराव मांडण्यात आला. बैठकीनंतर बॅनर्जी यांनी याबाबत वार्ताहरांशी बोलण्यास नकार दिला.
दुखापत झालेल्या बोटांवर प्रथमोपचार केल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि आपचे नेते संजय सिंह हे बॅनर्जी यांना पुन्हा बैठकीला घेऊन जात असल्याचे पाहावयास मिळाले. ओदिशातील दोन संघटनांच्यावतीने मते मांडण्यात येत होती. तेव्हा या विधेयकाशी यांचा संबंध काय, असा सवाल विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. बॅनर्जी यांना बोलण्याची प्रथम संधी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर त्यांनी चर्चेदरम्यान मध्येच उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही बोलण्याची अध्यक्षांनी त्यांना संधी दिली. मात्र त्यांनी पुन्हा एकदा मध्येच बोलण्याची परवानगी मागितली, तेव्हा पाल यांनी त्यास नकार देताच बॅनर्जी आणि गंगोपाध्याय यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आणि बॅनर्जी यांचा संयम सुटला.