श्रीलंकेत आंदोलकांचा रुद्रावतार, राष्ट्रपती राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन

श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुनाच्या सोळा सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली आहे.
 श्रीलंकेत आंदोलकांचा रुद्रावतार, राष्ट्रपती राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसताना शनिवारी दुपारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात आंदोलक घुसले. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर संतप्त आंदोलकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश केला. आंदोलकांचा रुद्रावतार पाहून राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पळ काढला आहे. आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे.श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुनाच्या सोळा सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली आहे. या साऱ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक बोलावली आहे.

श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक शुक्रवारी बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले. आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेशाचे प्रयत्न केले. यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमाव पांगला; मात्र काही तासांतच पुन्हा जमा झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू ठेवला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर सुरूच ठेवला आहे.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात घुसण्यास सुरुवात केली. यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांच्या झटापटीत पोलिसांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली. काही आंदोलक निवासस्थानाच्या मुख्य गेटवर चढून आत घुसले. आंदोलनस्थळी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सध्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र त्यांनी तिथून पळ काढल्याचे काही आंदोलकांनीच सांगितले.

देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांमध्ये दिसून येत आहे. श्रीलंकेची जनता इंधन,अन्न, औषधे यांच्या टंचाईशी तीव्र झुंज देत आहे. याचमुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याविरोधात गेले दोन महिने असंतोष भडकला आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी सरकारविरोधी आंदोलन पुकारण्यात आले होते. विरोधी पक्ष, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, कृषी संघटना इत्यादींनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. कालपासून देशाच्या विविध भागातून विद्यार्थी संघटना राजधानी कोलंबोच्या दिशेने येऊ लागल्या. शनिवारी सकाळीही श्रीलंकेच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने आंदोलक कोलंबोत दाखल होताना दिसले. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू असलेल्या रिकाम्या स्टेडियमबाहेरही आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. याआधी ११ मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. संतप्त जमावाने राजपक्षे यांच्या कोलंबो येथील शासकीय निवासस्थानाला वेढा घातला होता. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा देऊन देशाच्या पूर्वेकडील त्रिंकोमाली येथील लष्कराच्या छावणीत आश्रय घेतल्याच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे. श्रीलंकेच्या बिकट आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे बंधूंना दोषी ठरविले जात आहे.

श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर, पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी आंदोलनापूर्वी कर्फ्यू हटवला होता. सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, संचारबंदी उठवताच आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घराला घेराओ घातला. दुसरीकडे, रॅलीदरम्यान श्रीलंकेतील ​​पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in