डॉलरसमोर रुपयाचा नीचांकी स्तर,महागाईचा आणखीन भडका उडणार...

कच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहणार
डॉलरसमोर रुपयाचा नीचांकी स्तर,महागाईचा आणखीन भडका उडणार...
Published on

परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे रुपयाला मोठा फटका बसला आहे. चलन बाजारात आज गुरुवारी ९ जून रोजी डॉलरसमोर रुपयाने ७७.८१ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. यापूर्वी १७ मे २०२२ रोजी रुपयाने ७७.७९ रुपयांचा तळ गाठला होता. १७ मे रोजी डॉलर्सच्या तुलनेत रुपया ७७.७९ वर बंद झाला होता. तसेच जगात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति पिंप १२३ डॉलर्सवर पोहचल्या आहेत. रुपयाचे घसरणे व तेलाची किंमत वाढणे यामुळे ,आणखीन भडकणार आहे.

कच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहील, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन रोखण्याठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात असल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

विकसनशील देशातून परकीय वित्तसंस्था शेअर्स विकून आपला निधी काढून घेत आहेत. त्याचा मोठा परिणाम आता आशियाई देशातील चलनांवर होत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली. परदेशी वित्तसंस्थांनी बुधवारी २४८४.२५ कोटींचे समभाग विकले.

दरम्यान, जागतिक बँकेने विकास दराची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात विकास दर २.९ टक्के राहील, असे बँकेने नमूद केले. ज्याचा फायदा डॉलर इंडेक्सला झाला. डॉलर इंडेक्स ०.०१ टक्के वाढीसह १०२.५५ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर बाँड यिल्डमध्येदेखील सुधारणा झाली. रुपयातीन अवमूल्यनाने आयात बिलांचा खर्च भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय टीव्ही, एसी, फ्रिज, कॉम्प्युटर्स, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in