

नवी दिल्ली : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे मॉस्कोच्या देशांतर्गत शुद्धीकरण (रिफायनिंग) क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे, रशियाने ऑगस्ट महिन्यात १७२,००० टन तेल उत्पादनांची विक्रमी आयात केली. यामध्ये रशियाची भागभांडवल भागीदारी असलेल्या भारतातील रिफायनरीमध्ये रशियन कच्च्या तेलापासून तयार केलेल्या पेट्रोलचा (गॅसोलीन) समावेश आहे, असा दावा 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर' (सीआरईए) च्या अहवालात करण्यात आला आहे.
रशियन जीवाश्म इंधन निर्यात आणि निर्बंधांवरील आपल्या मासिक विश्लेषणात सीआरईएने सांगितले की, ऑगस्टमध्ये रशियाच्या तेल उत्पादन आयातीपैकी ७० टक्के पुरवठा भारताने केला. यामध्ये ७८ दशलक्ष युरो मूल्याच्या १२०,००० टन पेट्रोलचा समावेश आहे. रशियाच्या इंधन आयातीचे हे प्रमाण यापूर्वीच्या मासिक विक्रमाच्या सात पट आणि २०२५ मधील एकूण आयातीच्या तिप्पट होते. भारतातून पाठवण्यात आलेले सर्व पेट्रोल वाडिनार रिफायनरीमध्ये लोड करण्यात आले होते आणि ईयूचे निर्बंध असलेल्या 'नायरा एनर्जी' ने ते 'रोसनेफ्ट' ला विकले होते, असे सीआरईएने नमूद केले. रशियाची सागरी मार्गाने होणारी तेल उत्पादनांची निर्यात ऑगस्टमध्ये प्रमाणाच्या दृष्टीने २१ टक्क्यांनी घसरली. बंदरांवर उतरवलेल्या उत्पादनांमधून मिळणारा महसूल ३२ टक्क्यांनी घसरला.
रशियाच्या पेट्रोल आयातीत वाढ
ऐतिहासिकदृष्ट्या शुद्धीकृत पेट्रोलियम उत्पादनांचा जगात सर्वात मोठा निर्यातदार असलेला रशिया घसरत्या निर्यातीचा सामना करत असतानाही, त्याच्या पेट्रोल आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये रशियाच्या एकूण तेल-उत्पादन आयातीमध्ये पेट्रोलचा वाटा ७४ टक्के होता, तर २०२३ ते २०२५ दरम्यान हे प्रमाण सरासरी अवघे ६ टक्के होते.