
कारवार : कर्नाटकातील गोकर्ण येथील रामतीर्थ टेकडीवरील एका दुर्गम आणि धोकादायक गुहेत वास्तव्यास असलेल्या रशियन महिलेची तसेच तिच्या दोन मुलींची सुटका करण्यात आली. बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या आणि त्यानंतर हिंदू धर्म आणि भारतीय आध्यात्मिक परंपरांनी प्रभावित होऊन गोव्यामार्गे गोकर्णला पोहोचलेल्या या महिलेने अध्यात्मासाठी गुहेत राहणे पसंत केले होते.
रशियन वंशाची नीना कुटिना उर्फ मोही (४०) आणि मुलगी प्रेमा (६ वर्षे, ७ महिने) आणि अमा (४ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोकर्ण पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालत असताना, त्यांना धोकादायक, भूस्खलन-प्रवण क्षेत्रात असलेल्या एका गुहेजवळ हालचाल दिसली. यानंतर त्यांनी पाहणी केली असता त्यांना गुहेत वास्तव्यास असलेल्या या महिला आढळून आल्या.
पोलिसांनी चौकशी केली असता, नीनाने सांगितले की, “आध्यात्मिक एकांत शोधण्यासाठी आम्ही गोव्याहून गोकर्णला आलो. शहरी जीवनापासून दूर राहण्यासाठी तसेच ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी जंगलातील गुहेत राहणे आम्ही पसंद केले." महिलेने आपला हेतू चांगला असल्याचा दावा केला असला तरी अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षेबाबात पोलिसांनी चिंता व्यक्त केली. २०२४ साली या गुहेजवळ भूस्खलन झाले, त्यावेळी विषारी साप आढळले होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त शोधमोहीम राबवत रशियन महिलेचा पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. ती १७ एप्रिल २०१७ पासून भारतात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. रेकॉर्ड्सनुसार ती नेपाळलाही गेली होती. तेथून ती ८ डिसेंबर २०१८ साली पुन्हा भारतात आली होती. आता या महिलेची सखोल चौकशी करण्यात येत असून तिला परत रशियात पाठवण्यासाठी रशियन दूतावासाशी संपर्क साधण्यात आला आहे.