... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

भारत आणि चीन यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती स्थिर असणे आवश्यक आहे.
... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा
Published on: 

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती स्थिर असणे आवश्यक आहे. सीमेवर कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण झाल्यास त्याचे परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होतील, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तारही सीमेवरील शांतता आणि स्थैर्याशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चीनला आम्ही सांगतो की, तुम्हाला सामान्य संबंध हवे असतील आणि द्विपक्षीय संबंधांमधील अन्य क्षेत्रांतही प्रगती अपेक्षित असेल, तर सीमावर्ती भागातील परिस्थिती स्थिर असणे आणि तेथे शांतता व सलोखा कायम राहणे आवश्यक आहे. ही अगदी साधी आणि तर्कसंगत बाब आहे,’ असे जयशंकर यांनी सांगितले.

‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, २०२४ पासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यानुसार, भारत आणि चीनमधील संबंधही हळूहळू सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहेत.

सीमावादावर लवकर तोडगा काढण्याबाबत प्राथमिक स्वरूपाचा करार झाल्यास भारत चीनमधील गुंतवणुकीला अधिक संधी देईल का, असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विविध शक्यतांचा विचार सुरू असल्याचे सांगितले. आम्ही सध्या या शक्यतांचा विचार करत आहोत. यापुढे कोणत्या दिशेने जायचे, हे आम्हाला ठरवावे लागेल. मात्र, व्यापार करण्यासाठी सीमावाद पूर्णपणे सोडविलाच पाहिजे, असा आमचा आग्रह नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमची अपेक्षा तुलनेने मर्यादित आहे. ती म्हणजे सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य कायम राखणे. सीमावादाच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याच्या संभाव्य कराराचा संबंध अन्य कोणत्याही बाबीशी जोडण्याचा माझा विचार नाही. व्यापारविषयक धोरणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाशी संबंधित मुद्द्यांवर स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल.”

चीनसोबतच्या व्यापारातील असमतोलावर चिंता

जयशंकर यांनी चीनसोबतच्या आर्थिक संबंधांमधील समस्यांकडेही लक्ष वेधले. दोन्ही देशांमधील व्यापारात चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकते माप असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०२० मधील गलवान संघर्षामुळे संबंधांमध्ये तणाव

जयशंकर यांनी २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षाचाही उल्लेख केला. या घटनेमुळे भारत आणि चीनमधील संबंधांवर गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. १९७५ ते २०२० या ४५ वर्षांच्या कालावधीत भारत-चीन सीमेवर रक्तपात झाला नव्हता. सीमेवरील जीवितहानीची शेवटची घटना १९७५ मध्ये घडली होती. या काळात भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये प्रगतीही झाली,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “२०२० मध्ये, जेव्हा संपूर्ण जग कोविडच्या निर्बंधांचा सामना करत होते, तेव्हा भारत आणि चीनच्या सीमेवर अनेक समस्या निर्माण झाल्या. अखेरीस, दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक मृत्युमुखी पडलेल्या संघर्षात त्याचे रूपांतर झाले.

चीनमध्ये भारतीयांना समान संधी नाहीत

दोन्ही देशांमधील व्यापार हा चीनच्या बाजूने झुकलेला आहे. हा असमतोल अत्यंत एकतर्फी आहे. चीनमध्ये आम्हाला बाजारपेठेत पुरेसा प्रवेश मिळालेला नाही. तसेच, त्या क्षेत्रांमध्ये चीनमध्ये यशस्वी व्यावसायिक व्यवहार उभारण्यातही आम्हाला अडचणी आल्या आहेत. भारताने चीनला ज्या प्रकारे समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या तुलनेत चीनमध्ये भारतीय कंपन्यांना समान संधी मिळत नाहीत, असे आम्हाला वाटते,’ असेही जयशंकर यांनी नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in