मॉस्को : रशियन तेल खरेदीबाबत भारतावर अमेरिकेने लावलेला ‘टॅरिफ’चा बडगा ‘अतर्क्य’ आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपले रशियन समकक्ष मंत्री सर्गेई लॅवरॉव्ह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी रशियन तेल खरेदीबाबत अमेरिकेने लादलेल्या टॅरिफबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार भारत नसून चीन आहे, तर रशियन ‘एलएनजी’चा मोठा खरेदीदार युरोपियन महासंघ आहे. २०२२ नंतर रशियासोबत भारताने मोठी व्यापार वाढ केली नाही. जागतिक ऊर्जा बाजार स्थिर करण्यासाठी भारताने मदत केली पाहिजे, असा लकडा अमेरिका अनेक वर्षांपासून लावत आहे. ज्यात रशियन तेल खरेदी गरजेची आहे. तसेच भारत अमेरिकेकडूनही तेल खरेदी करतो. त्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा तर्क समजणे कठीण झाले आहे.
व्यापार संतुलन सुधारण्याचे उपाय
जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. शेती, औषध, वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताची निर्यात वाढल्यास व्यापार असंतुलन सुधारण्यास मदत मिळेल. भारत हा रशियाचा दुसरा मोठा तेल आयातदार देश आहे. रशियन-युक्रेन युद्धानंतर भारताच्या रशियन तेलाच्या आयातीला वेग आला आहे. अमेरिका आता त्याला ‘टॅरिफ’चे कारण मानत आहे.
भारत-रशिया संबंध मजबूत
ते म्हणाले की, भारत-रशिया हे जागतिक स्तरावर सर्वात जास्त ‘स्थिर’ संबंध असलेल्या देशात मोडतात. ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक आदी महत्त्वाच्या बाबी आहेत. आमचे संरक्षण व सैन्य तंत्रज्ञान सहकार्य भक्कम आहे. रशिया हा भारताच्या ‘मेक इन इंडिया’च्या लक्ष्याला सहकार्य करतो.