

नवी दिल्ली : धार्मिक प्रथा आणि परंपरा हा श्रद्धेचा विषय असून त्या पवित्र मानल्या जातात, त्यामुळे न्यायालयाने 'महत्त्वाच्या धार्मिक प्रथा' कोणत्या हे ठरवू नये, अशी भूमिका अखिल भारतीय संत समितीने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. शबरीमाला फेरविचार याचिकेवर होणाऱ्या सुनावणीत हस्तक्षेप करण्याची परवानगी या समितीने मागितली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ ७ एप्रिलपासून या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू करणार आहे. यामध्ये शबरीमाला मंदिरासह विविध धार्मिक स्थळांवरील महिलांशी होणारा भेदभाव आणि धार्मिक स्वातंत्र्याची व्याप्ती यावर चर्चा होणार आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ४:१ अशा बहुमताने १० ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा जुना नियम बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या फेरविचार याचिकांवर आता सुनावणी होणार आहे.
सुमारे १२७ संप्रदाय, १८.५ लाख पुजारी आणि १२ लाख साधूंचे आपण प्रतिनिधित्व करतो असे संत समितीचे म्हणणे आहे. या संघटनेने वकील अतुलेश कुमार यांच्यामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली आहे.
धार्मिक बाबींमध्ये निर्णय घेण्यासाठी न्यायालये ही तज्ज्ञ संस्था नाहीत. जोपर्यंत एखाद्या धार्मिक प्रथेमुळे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता किंवा आरोग्य धोक्यात येत नाही, तोपर्यंत न्यायपालिकेने हस्तक्षेप करू नये, असा त्यांचा युक्तिवाद आहे. समानतेचा अधिकार (कलम १४) हा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर (कलम २५) गदा आणण्यासाठी वापरला जाऊ नये. धर्माचे पालन करणे हा वैयक्तिक श्रद्धेचा आणि अंतर्गत विश्वासाचा भाग आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
शबरीमाला येथील देवतेचे स्वरूप 'नैष्ठिक ब्रह्मचारी' असे आहे. येथील परंपरेनुसार भाविकांना ४१ दिवसांचे कठोर व्रत पाळावे लागते, जे विशिष्ट वयोगटातील महिलांना पाळणे कठीण असते, असे परंपरेचे मानणे आहे असे त्यांनी म्हटले आहे. आता ७ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आणि घटनात्मक समानता यांमधील सीमा आखली जाण्याची शक्यता आहे.
हा भेदभाव नाही
लॉर्ड अयप्पा यांची देशात १००० हून अधिक मंदिरे आहेत, जिथे कोणतीही वयोमर्यादा नाही. त्यामुळे शबरीमाला येथील परंपरा ही त्या विशिष्ट मंदिराच्या स्वरूपाशी निगडित आहे आणि ती केवळ एका वयोगटासाठी असल्याने तिला भेदभाव म्हणता येणार नाही, असा त्यांचा दावा आहे. शबरीमाला येथील देवतेचे स्वरूप 'नैष्ठिक ब्रह्मचारी' असे आहे. येथील परंपरेनुसार भाविकांना ४१ दिवसांचे कठोर व्रत पाळावे लागते, जे विशिष्ट वयोगटातील महिलांना पाळणे कठीण असते, असे परंपरेचे मानणे आहे असे त्यांनी म्हटले आहे.