

जोधपूर : राजस्थानमधील प्रसिद्ध साध्वी प्रेम बाईसा यांचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. जोधपूरमधील पाल गाव येथील आश्रमात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आश्रम सील केला असून मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे.
व्हिडीओमुळे तर्कविर्तक
बुधवारी सकाळी साध्वी प्रेम बाईसा यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर आश्रमातच डॉक्टरांना बोलावून त्यांना इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शननंतर त्यांना थोडा वेळ आराम मिळाला, मात्र एका तासानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या वर्षी सोशल मीडियावरील एका वादामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्या अध्यात्मिक कार्यात सक्रिय होत्या. मंगळवारीच त्या अजमेर येथे नऊ दिवसांची भागवत कथा पूर्ण करून आश्रमात परतल्या होत्या.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे साध्वी प्रेम बाईसा प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
पोस्टमुळे खळबळ
हॉस्पिटलच्या माहितीनुसार, साध्वींचे निधन संध्याकाळी ५:३० वाजता झाले होते, परंतु रात्री ९:२८ वाजता त्यांच्या अकाऊंटवरून एक मोठी पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्मासाठी आपले जीवन समर्पित केल्याचा आणि 'अग्निपरीक्षा' यांसारख्या शब्दांचा उल्लेख केला आहे.
साध्वींचा मृत्यू संध्याकाळी झाला होता, तर रात्री ही पोस्ट कोणी केली, ही एखादी सुसाइड नोट होती जी आधीच 'शेड्यूल' केली होती, की ती इतर कोणी अपलोड केली, याचा पोलीस तपास करत आहेत.
दाव्यांमुळे वाढले गूढ
प्रेक्षा हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण जैन यांच्या म्हणण्यानुसार, साध्वींचे वडील त्यांना ताप येत असल्याची तक्रार घेऊन आले होते. असे सांगण्यात आले की, आश्रमातील नर्सिंग स्टाफने त्यांना एक इंजेक्शन दिले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. धक्कादायक बाब म्हणजे, हॉस्पिटलने रुग्णवाहिकेची तयारी दर्शवूनही, वडिलांनी मृतदेह खासगी वाहनाने नेण्याबाबत सांगितले. या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूवर खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीव्र शोक व्यक्त करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्ट मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राजस्थान पोलिसांना टॅग करत नमूद केले आहे की, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. जोधपूरमधील रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद परिस्थितीत झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आहे.