कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

वैशिष्ट्यपूर्ण आणि ग्रामीण लेखनासाठी प्रसिद्ध असलेले कृष्णात खोत यांनी कादंबरीकार अशी वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
PM

नवी दिल्ली : अस्सल ग्रामीण लेखक आणि आपल्या कसदार लेखणीने मराठी साहित्य विश्वाला भुरळ घालणारे सुप्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कांदबरीला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणी भाषेतील साहित्यासाठी प्रकाश पर्यकर यांच्या ‘वर्सल’ कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने या पुरस्कारांची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, शाल व ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरुप असून १२ मार्च २०२४ रोजी या पुरस्काराने वितरण होणार आहे. देशातील २४ भाषांमधील साहित्यिकांना बुधवारी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

वैशिष्ट्यपूर्ण आणि ग्रामीण लेखनासाठी प्रसिद्ध असलेले कृष्णात खोत यांनी कादंबरीकार अशी वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. खोत यांच्या लेखनाला शतकारंभीने आरंभ झाला आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा ‘गावठाण’, ‘रौंदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’, ‘रिंगाण’ या त्यांच्या कांदबऱ्या तर ‘नांगरल्याविन भुई’ हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

‘रिंगाण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण आले आहे. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. नव्वद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची ओळख आहे. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्य शासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in