परवडणाऱ्या घरांची विक्री १६ टक्क्यांनी घटली

२०१८ साली एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचा हिस्सा तब्बल ५४ टक्के होता. २०२३ साली एकट्या मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत ६ टक्के घट झाली आहे.
परवडणाऱ्या घरांची विक्री १६ टक्क्यांनी घटली
Published on

नवी दिल्ली : नाईट ॲण्ड फ्रँक इंडिया या मालमत्ता क्षेत्रातील प्रख्यात संस्थेने केलेल्या ताज्या पाहणीत भारतातील प्रमुख आठ शहरांमध्ये ५० लाखांच्या खाली किंमत असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत गेल्या २०२३ साली तब्बल १६ टक्के घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या वर्षभरात देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये ५० लाख रुपयांच्या खाली मूल्याची एकूण ९८ हजार घरे विकली गेली आहे. वाढीव व्याजदर आणि घरांच्या कडाडलेल्या किमती यामुळे निम्न मध्यमवर्गियांना घर घेणे आता परवडेनासे झाले आहे. मात्र घरांच्या एकूण विक्रीत ५ टक्के वाढ झाली असून देशभरात एकूण ३२९९०७ घरांची २०२३ साली विक्री झाली आहे. यात सर्व प्रकारच्या घरांचा समावेश आहे. नाईट ॲण्ड फ्रँक संस्थेने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु, पुणे, अहमदाबाद, आणि हैदराबाद या शहरातील आकडेवारीवरुन हा अहवाल तयार केला आहे.

विशेष बाब म्हणजे २०२३ साली ५० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांचा पुरठा तब्बल २० टक्क्यांनी पडला आहे. याचा देखील या घरांची विक्री कमी होण्यावर परिणाम झाला आहे. मात्र अलिशान व मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे या शहरांमधील एकूण घरविक्री ५ टक्क्यांनी वाढून गेल्या दहा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. रियल इस्टेट सल्लागार संस्था नाईट ॲण्ड फ्रँकने बुधवारी आपला ताजा अहवाला वेबिनारच्या माध्यमातून जाहीर केला. त्यानुसार ५० लाखांखाली किमतीच्या निवासी जागांची विक्री ९७९८३ झाली असून ती २०२२ सालातील ११७१३१ विक्रीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी घटली आहे. यामुळे २०२३ साली झालेल्या एकूण घरविक्रीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रिचा हिस्सा ३७ टक्क्यांवरुन ३० टक्क्यांवर घसरला आहे. याउलट एक कोटीपेक्षा अधिक किमत असलेल्या घरांचा या विक्रितील हिस्सा २७ टक्क्यांवरुन वाढून ३४ टक्के झाला आहे. नाईट ॲण्ड फ्रँक इंडिया चे सीएमडी शिशिर बैजल म्हणाले की महागडी घरे खरेदी करण्याचा कल लक्षात घेता निवासी जागांची बाजारपेठ सातत्याने वरच्या पातळीच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे अधोरेखित होत आहे. देशाचा भक्कम आर्थिक विकास हे देखील त्यामागील एक कारण आहे. यामुळे ग्राहकांचा दिर्घकालीन गुंतवणूक करण्यात विश्वास वाढला आहे. मागील दशकभरात ग्राहकांची घर खरेदीची क्षमता झपाट्याने वाढली आहे. यामुळेच घरांच्या किमती वाढत असूनही विक्रित वाढ होत आहे.

परवडणाऱ्या घरांच्या विक्रितील घसरणीची अनेक कारणे आहेत. वाढलेल्या किमती हे प्रमुख कारण असून त्याला वाढलेले व्याजदर देखील तितकेच कारणीभूत आहे. तसेच कोव्हिड महामारीचाही परवडणाऱ्या घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

मुंबईत सर्व प्रकारच्या घरांच्या एकूण विक्रीत २ टक्के वाढ झाली असून ८६८७१ घरांची यंदा विक्री झाली आहे. गेल्या वर्षी या शहरात ८५१६९ घरांची विक्री झाली हेाती. तसेच दिल्ली त घरांची एकूण विक्री ३ टक्क्यांनी वाढून ६०००२ झाली आहे. बेंगळुरु शहरात घरांची एकूण विक्री १ टक्का वाढून ५४०४६ झाली आहे. मात्र पुणे शहरात घरांची विक्री १३ टक्क्यांनी वाढून ४९२६६ झाली आहे.

२०१८ साली एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचा हिस्सा तब्बल ५४ टक्के होता. २०२३ साली एकट्या मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत ६ टक्के घट झाली आहे. २०२२ साली मुंबईत ४१५९५ परवडणारी घरे विकली गेली होती तर २०२३ साली ३९०९३ घरे विकली गेली आहेत. देशपातळीवर विचार केल्यास बेंगळुरु शहरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत सर्वाधिक म्हणजे तब्बल ४६ टक्के घट झाली आहे. २०२२ साली या शहरात १५२०५ परवडणारी घरे विकली गेली होती तर २०२३ साली केवळ ८१४१ घरे विकली गेली आहेत. दिल्लीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत ४४ टक्के घट झाली असून यंदा तेथे एकूण ७४८७ घरे विकली गेली आहेत तर २०२२ साल १३२९० घरे विकली गेली होती.

logo
marathi.freepressjournal.in