ज्येष्ठ पर्यावरणवादी थिमक्का यांचे निधन

ज्येष्ठ पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या ११४ वर्षांच्या होत्या. थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या आणि बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ पर्यावरणवादी थिमक्का यांचे निधन
Published on

बंगळुरू : ज्येष्ठ पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या ११४ वर्षांच्या होत्या. थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या आणि बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तुमकूरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात ३० जून १९११ रोजी त्यांचा जन्म झाला होता. ग्रामीण कर्नाटकात अनेक दशके केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. बेंगळुरू दक्षिणमधील रामनगर जिल्ह्यातील हुलिकल आणि कुडूरदरम्यानच्या ४.५ किमीच्या पट्ट्यात त्यांनी वडाची ३८५ झाडे लावल्यामुळे त्यांना ‘सालूमरदा’ (झाडांची रांग) हे नाव मिळाले. वैयक्तिक पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी रोपे लावण्यास सुरुवात केली आणि त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवले.

त्यांचे हे कार्य कालांतराने तळागाळातील पर्यावरण संवर्धनासाठी एक मापदंड ठरले आणि त्या शाश्वत जीवनाचे प्रतीक बनल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला, ते म्हणाले की, हजारो झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या ‘सालूमरदा तिम्मक्का’ यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. पर्यावरणावरील त्यांच्या प्रेमाने त्यांना ‘अमर’ केले आहे आणि त्यांच्या जाण्याने राज्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in