
https://twitter.com/i/status/1968925784162340867नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले असून त्यामुळे पक्षाची चांगलीच कोंडी होण्याची लक्षणे दिसत आहेत. आपण जेव्हा पाकिस्तानला गेलो होतो तेव्हा आपल्याला घरीच आल्यासारखे वाटले, असे विधान पित्रोदा यांनी केले आहे. या विधानावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
आपले मत असे आहे की, आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वात प्रथम आपल्या शेजारच्या देशांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण आपल्या शेजारच्या देशांशी संबंध खरोखरच सुधारू शकतो का, आपणही पाकिस्तानला गेलो होतो. तुम्हाला सांगतो की, आपल्याला घरी असल्यासारखे वाटले. आपण बांगलादेश, नेपाळला गेलो तेथेही आपल्याला घरी असल्यासारखे वाटले. परदेशात असल्यासारखे वाटले नाही, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.
भाजप प्रवक्त्याची टीका
पित्रोदा यांच्या या विधानाचा व्हिडीओ भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वर शेअर करत जोरदार टीका केली आहे. प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींचे अत्यंत जवळचे नेते आणि काँग्रेस ओव्हरसीज प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की, त्यांना पाकिस्तानमध्ये ‘घरच्यासारखं वाटले. २६/११ नंतरही यूपीएने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, यात आश्चर्य नाही, असे भंडारी यांनी म्हटले आहे.
पित्रोदा यांची वादग्रस्त वक्तव्ये
पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी अनेक अशी वक्तव्ये केली जी वादग्रस्त होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पित्रोदा यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले होते की, मध्यमवर्गाने सर्व गरीब कुटुंबांसाठी किमान उत्पन्नाची हमी देण्यासाठी अधिक कर भरायला हवा, त्यांना स्वार्थी होऊन जमणार नाही. या विधानानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना स्पष्ट करावे लागले की, काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास मध्यमवर्गावर अतिरिक्त कराचा बोजा वाढणार नाही.
धर्म वैयक्तिक गोष्ट
जून २०२३ मध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत अमेरिकेत एका कार्यक्रमात पित्रोदा म्हणाले होते की, आम्हाला बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची समस्या आहे, या गोष्टींवर कोणी बोलत नाही. पण, प्रत्येक जण राम, हनुमान आणि मंदिराबद्दल बोलतो, मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत. ते म्हणाले होते की, जेव्हा संपूर्ण देश राम मंदिर आणि रामजन्मभूमीवरच बोलत असतो, तेव्हा मला त्रास होतो. माझ्यासाठी धर्म ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे आणि राष्ट्रीय समस्या म्हणजे शिक्षण, रोजगारवाढ, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य, पर्यावरण व प्रदूषण आहेत; पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही.