संभल हिंसाचार : सपा खासदार, आमदारपुत्र आरोपी; ७ एफआयआर नोंदविले; आतापर्यंत २५ जणांना अटक

येथील मोगलकालीन मशिदीचा न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व्हे केला जात असताना हिंसाचाराचा उद्रेक झाला. त्या अनुषंगाने पोलिसांनी सात एफआयआर नोंदविले असून त्यामध्ये सपाचे खासदार झिया-ऊर-रेहमान बर्क आणि सपाचे स्थानिक आमदार इक्बाल मेहमूद यांचा पुत्र सोहेल इक्बाल यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे,
संभल हिंसाचार : सपा खासदार, आमदारपुत्र आरोपी; ७ एफआयआर नोंदविले; आतापर्यंत २५ जणांना अटक
Published on

संभल : येथील मोगलकालीन मशिदीचा न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व्हे केला जात असताना हिंसाचाराचा उद्रेक झाला. त्या अनुषंगाने पोलिसांनी सात एफआयआर नोंदविले असून त्यामध्ये सपाचे खासदार झिया-ऊर-रेहमान बर्क आणि सपाचे स्थानिक आमदार इक्बाल मेहमूद यांचा पुत्र सोहेल इक्बाल यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे, असे सोमवारी पोलिसांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून संभलमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत बाहेरील लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संभल तहसीलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून सोमवारी जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करण्यास निदर्शकांनी विरोध केल्यानंतर रविवारी तेथे निदर्शक आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली होती. त्यामध्ये तीन जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, तर अन्य एका जखमीचा सोमवारी मृत्यू झाला.

या हिंसाचारप्रकरणी सात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये बर्क आणि सोहेल यांच्यासह सहा जणांची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे, तर अन्य २७५० जणांची अज्ञात म्हणून नोंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. बर्क यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे स्थिती खूपच बिघडली, असे अधीक्षक म्हणाले. आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असून हिंसाचारात सहभाग असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

सध्या स्थिती नियंत्रणाखाली असून सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा दिवस असतानाही दुकाने उघडण्यात आली होती. सक्षम अधिकाऱ्याच्या अनुमतीविना बाहेरील कोणत्याही व्यक्तीला, सामाजिक संघटनांना अथवा लोकप्रतिनिधीला जिल्ह्याची सीमा ओलांडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in