समीर वानखेडेंच्या अवैध संपत्तीची पोलखोल ; एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाचा रिपोर्ट

परदेश दौरे, महागडे फ्लॅट, महागड्या घड्याळांच्या खरेदी-विक्रीच्या गौडबंगालामुळे वानखेडे यांची सखोल चौकशी आवश्यक
समीर वानखेडेंच्या अवैध संपत्तीची पोलखोल ; एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाचा रिपोर्ट

कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) विशेष चौकशीचा रिपोर्ट तयार केला आहे. परदेश दौरे, महागडे फ्लॅट, महागड्या घड्याळांच्या खरेदी-विक्रीच्या गौडबंगालामुळे वानखेडे यांची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे मत एनसीबीच्या अहवालात नमूद केले आहे.

वानखेडे यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान ५ वर्षात आपल्या कुटुंबासोबत ६ वेळा खासगी परदेश दौरे केले. इंग्लंड, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, मालदीव येथे त्यांनी एकूण ५५ दिवस मुक्काम केला. त्यासाठी त्यांनी ८.७५ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवले. मात्र, या पैशात केवळ विमानाचे तिकीटच येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी १९ दिवस मुक्काम केला. त्यात त्यांनी केवळ एक लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले.

दक्षता विशेष चौकशीच्या रिपोर्टनुसार, जुलैमध्ये २०२१ मध्ये समीर व त्यांचे मित्र जमालुद्दीन हे त्यांच्या कुटुंबीयांसह मालदीवला ताज एक्झॉटिकामध्ये राहत होते. समीर यांनी आपल्या कुटुंबासाठी ७.५ लाख रुपये खर्च केले. तसेच वानखेडे यांनी २२ लाखांचे रोलेक्स सोन्याचे घड्याळ १७ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केले. यासाठी त्यांनी जमालुद्दीन राजन यांच्याकडून कर्ज घेतले.

परदेश दौऱ्यात त्यांनी प्रवास, निवास, व्हिसा, किरकोळ खर्च यासाठी १ ते २.५ लाख रुपये खर्च दाखवला. जुलै २०२१ मध्ये त्यांनी मालदीवचा दौरा केला. तेव्हा त्यांनी संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले. विराल राजनकडून समीर वानखेडे यांनी ५,५९,८८४ रुपये कर्ज घेतले. त्याची माहिती त्यांनी एनसीबीला दिली नसल्याचे मान्य केले. तसेच ९,०३,०५५ रुपयांची रोख रक्कम विराल यांच्याकडून जमालुद्दीन यांच्या भागीदाराला हॉटेल बुकिंगवेळी देण्यात आली. हा सर्व व्यवहार संशयास्पद होता.

वानखेडे यांच्या महागडी घड्याळे खरेदी व विक्रीबाबत संशय निर्माण झाला आहे. वानखेडे यांनी घड्याळे विकल्यावर त्यांना तातडीने पैसे कसे मिळाले. त्याचे खरेदीदारही अज्ञात आहेत. तसेच २२ लाख रुपयांचे घड्याळ खरेदीसाठी त्यांना कर्ज कसे मिळाले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांच्या रोलेक्स घड्याळाच्या इन्व्हाईसच्या सत्यतेची पडताळणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

वानखेडेंचे मुंबईत चार फ्लॅट

समीर वानखेडे यांचे मुंबईत ४ फ्लॅट असून वाशीममध्ये शेकडो एकर जमीन आहे. समीर यांनी गोरेगाव येथे पाचवा फ्लॅट विकत घेताना ८२,८७,३९९ रुपये मोजले. मात्र, या फ्लॅटची किंमत २,४५,४९,९१८ रुपये आहे. या मालमत्तेची त्यांनी जाहीर केलेली किंमत आणि कागदपत्रे वेगळी आहेत. या फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशाचा स्त्रोत व व्यवहार यांची तपशीलवार चौकशी गरजेची आहे.

आयटीआरमधील उत्पन्न व खर्चाचा मेळ बसेना

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० दरम्यान समीर यांनी (३१,५५,८८३ रुपये) तर पत्नी क्रांती यांनी (१४,०५,५७७ रुपये) उत्पन्न दाखवले. दोघांचे एकत्रित उत्पन्न ४५,६१,४६० रुपये येते. तर मालदीपची टूर (७,२५,००० रुपये), रोलेक्स घडयाळ (२२,०५,००० रुपये) असे एकूण २९,३०,००० रुपये खर्च दाखवला. पत्नी क्रांती यांनी लग्नापूर्वी फ्लॅटसाठी १.२५ कोटी रुपये दिले, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. त्यांचे लग्न ८ फेब्रुवारी २०१७ मध्ये झाले. २०१६-१७ च्या तिच्या प्राप्तिकर विवरणपत्रात पैशाचा स्त्रोत दाखवला नाही.

परदेश भेटींचा कमी दाखवलेला खर्च, फ्लॅट सजावटीसाठी १० लाख रुपयांचा खर्च, फ्लॅटच्या खरेदीच्या वेगवेगळ्या रकमेमुळे त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची सखोल तपासणी आवश्यक आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in