बिहारला विशेष दर्जा अथवा पॅकेज देण्याची जेडीयूची मागणी; संजय झा जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष

बिहारला विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा अथवा विशेष पॅकेज द्यावे, अशी विनंती जेडीयूने केंद्र सरकारला शनिवारी केली आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते अधोरेखित केले.
बिहारला विशेष दर्जा अथवा पॅकेज देण्याची जेडीयूची मागणी; संजय झा जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष
ANI
Published on

नवी दिल्ली : बिहारला विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा अथवा विशेष पॅकेज द्यावे, अशी विनंती जेडीयूने केंद्र सरकारला शनिवारी केली आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते अधोरेखित केले. त्याचप्रमाणे जेडीयूने शनिवारी खासदार संजय झा यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. त्यावेळी महागाई आणि बेरोजगारी हे ज्वलंत प्रश्न असून रालोआ सरकार त्यावर मात करण्यासाठी अधिक परिणामकारक पावले उचलतील, असा राजकीय ठराव यावेळी करण्यात आला.

पक्षाच्या कार्याध्यक्षपदी संजय झा यांची नियुक्ती करून नितीश कुमार यांनी भाजपशी उत्तम समन्वय ठेवण्याचे आणि राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा उत्तम वापर करून घेण्याचे सूचित केले.

पेपरफुटीचे पडसाद

पेपरफुटी प्रकरणाचे पडसादही या बैठकीत उमटले आणि केंद्रीय स्पर्धात्मक परीक्षांची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असा ठरावही करण्यात आला. पेपरफुटीच्या प्रकारांना आ‌ळा घालण्यासाठी संसदेने कडक कायदा करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in