

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारकडून दबाव टाकण्यात आला होता असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. धनखड यांनी घेतलेल्या काही “स्वतंत्र निर्णयांमुळे” मोदी सरकार नाराज होते आणि त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असा राऊत यांचा दावा आहे.
अनलाईकली पॅरेडाईज या पुस्तकात राऊत यांनी हा दावा केला आहे. मूळ मराठी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादात आणखी चार प्रकरणे जोडण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या कारवायांवर टीका करत ती भाजपची ‘शाखा’ असल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थांवर केंद्र सरकारचा दबाव असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीत सोमवारी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रकृतीचे कारण देत अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अंमलबजावणी संचालनालयाने धनखड यांच्या मालमत्ता व्यवहारांबाबत आणि परदेशी खात्यांमध्ये झालेल्या पैशांच्या व्यवहारांबाबत एक फाइल तयार केली होती. ही फाईल दबावासाठी वापरण्यात आली, असे राऊत यांचे म्हणणे आहे.