संजय राऊत यांच्या अटकेचे संसदेत तीव्र पडसाद;विरोधी पक्षांचा संसदेत गदारोळ

कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाज दुपारी १२ आणि त्यानंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले
संजय राऊत यांच्या अटकेचे संसदेत तीव्र पडसाद;विरोधी पक्षांचा संसदेत गदारोळ

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे सोमवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. महागाई, जीएसटी, वाढती बेरोजगारी, कृषी समस्या आदी मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांनी राऊतांच्या अटकेवरून संसदेत गदारोळ केला. यामुळे कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाज दुपारी १२ आणि त्यानंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ‘ईडी’ने रविवारी रात्री अटक केल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारविरोधात नारेबाजी केली. त्यांना काँग्रेससह इतर पक्षांचीही साथ मिळाली. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी या गदारोळाप्रकरणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांना समज दिली.

दुसरीकडे, काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत राऊतांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. ‘संजय राऊत यांनी भाजपच्या घाबरवण्याच्या व धमक्यांच्या राजकारणाला भीक घातली नाही. ते दृढविश्वास व धाडसी व्यक्ती आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,’ असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधकांनी चालू अधिवेशनात महागाई, जीएसटी, वाढती बेरोजगारी, कृषी समस्या आदी मुद्द्यांवरून सरकारची कोंडी केली असतानाच आता राऊतांच्या अटकेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडल्यामुळे अधिवेशनाचा उर्वरित कालावधीही वाया जाण्याची भीती आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in