छत्तीसगडचा तांदूळ कर्करोगावर ‘संजीवनी’! कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचा गुणधर्म

कर्करोगाचे नाव काढताच अनेकांना धक्काच बसतो. केमोथेरपी व वर्षानुवर्षे चालणाऱ्या वेदनादायक औषधांमुळे रुग्ण घायकुतीला येतात. रुग्णासोबत त्याचे कुटुंबीयही कोलमडून पडते. आता शस्त्रक्रिया व किरणोत्सर्गाशिवाय कर्करोग बरा होतो, असे सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? पण...
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

बस्तर : कर्करोगाचे नाव काढताच अनेकांना धक्काच बसतो. केमोथेरपी व वर्षानुवर्षे चालणाऱ्या वेदनादायक औषधांमुळे रुग्ण घायकुतीला येतात. रुग्णासोबत त्याचे कुटुंबीयही कोलमडून पडते. आता शस्त्रक्रिया व किरणोत्सर्गाशिवाय कर्करोग बरा होतो, असे सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? पण, छत्तीसगडमधील दुर्मिळ ‘संजीवनी’ तांदळाचे सेवन केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या तांदळातील औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात, असे यावर संशोधन करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.

रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या अनुवांशिक आणि रोप विभागाने बस्तरमधील दुर्मिळ तांदळाच्या जातीवर संशोधन केले. या तांदळाचे सेवन केल्यास कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात, असे संशोधनात आढळल्याने त्याचे नामकरण ‘संजीवनी’ केले. या संजीवनी तांदळाच्या रोपाला पेटंटही मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तांदळाचे उद‌्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रायपूरच्या इंदिरा गांधी विश्वविद्यालयाचे प्रा. दीपक शर्मा यांनी ‘बीएआरसी’च्या ‘रेडिएशन बायोलॉजी ॲॅण्ड हेल्थ सायन्स’च्या विभागासोबत २०१६ पासून तांदळाच्या एका जातीवर संशोधन सुरू केले. या तांदळातील औषधी गुणधर्म शोधणे हा त्याचा मूळ उद्देश होता.

‘बीएआरसी’त उंदरावर केले परीक्षण

संजीवनी तांदळाचे परीक्षण ‘बीएआरसी’मध्ये उंदरावर करण्यात आले आहे. या परीक्षणात उंदरावर सकारात्मक परिणाम दिसून आले. केंद्रीय औषध संशोधन संस्थेनेही ‘संजीवनी’ तांदळात कर्करोगाविरोधात लढा देणारे गुणधर्म असल्याचे सांगितले. या तांदळाची मानवी चाचणी जानेवारीपासून टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयात करण्यात येणार आहे. या तांदळात २१३ प्रकारची जैवरसायने आढळली असून त्यातील ७ कर्करोगविरोधी आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत या तांदळाचा वैद्यकीय उपचारासाठी उपयोग होऊ शकतो, असे प्रा. दीपक शर्मा म्हणाले.

संजीवनी तांदळाचे सेवन कसे करावे?

-दहा दिवस दहा ग्रॅम तांदळाचे सेवन करावे.

-सकाळी उपाशीपोटी हा तांदूळ खावा.

सामान्य व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढणार.

कर्करोगाच्या पेशी निर्मितीस अटकाव.

logo
marathi.freepressjournal.in