शनीचे कडे २०२५ साली गायब होणार ;२०३२ पासून पुन्हा दिसणार

पृथ्वीवरून पाहताना या कड्यांचे प्रतल साधारण ९ अंशांनी कललेले असते.
शनीचे कडे २०२५ साली गायब होणार ;२०३२ पासून पुन्हा दिसणार
Published on

नवी दिल्ली : सूर्यमालेतील शनी हा ग्रह त्याच्या भोवतालच्या कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. विविध छायाचित्रांमध्ये त्याचे हे कडे सुंदर दिसतात आणि त्यामुळे तो सहजपणे वेगळा ओळखून येतो. शनीचे हे कडे २०२५ साली पृथ्वीवरून दिसेनासे होणार आहेत. मात्र, त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. २०३२ साली शनीचे कडे पुन्हा चांगल्या प्रकारे दिसू लागणार आहेत.

शनी ग्रहाभोवताली साधारण सात कडे आहेत. ती दगड-माती, धूळ, धुमकेतू आणि उल्कांचे अवशेष आदी पदार्थांपासून बनले असल्याचे मानले जाते. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांची लांबी इतकी आहे की, त्याने पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर व्यापले जाईल. शनी ग्रहाच्या पृष्ठभागापासून हे कडे १ लाख ७५ हजार मैलांपर्यंत पसरले आहेत. त्यामुळे ते रात्री आकाशात दुर्बिणीद्वारे किंवा नुसत्या डोळ्यांनाही दिसतात. मात्र, पुढील १८ महिन्यांनी हे कडे दिसेनासे होणार आहेत. त्यामागे कोणताही चमत्कार किंवा भीतीचे कारण नसून ही केवळ एक शास्त्रीय घटना आहे.

शनीचे कडे साधारण ९० मीटर जाडीचे किंवा उंचीचे आहेत. पृथ्वीवरून पाहताना या कड्यांचे प्रतल साधारण ९ अंशांनी कललेले असते. शनी ग्रह जसजसा फिरत जाईल तसतसा कड्यांच्या कलण्याचा कोन बदलत जातो. शनीचे कडे २०२४ सालात केवळ ३.७ अंशांनी कललेले असतील आणि त्यानंतर हा कोन आणखी कमी होत जाऊन मार्च २०२५ मध्ये शून्य अंशावर जाईल. त्यामुळे पृथ्वीवरून शनीचे कडे दिसणार नाहीत. मात्र, हा केवळ दृष्टिभ्रम असेल. हळूहळू शनी फिरत जाऊन कड्यांचा कोनही बदलत जाईल. २०३२ साली शनीचे कडे २७ अंशांनी झुकलेले असतील. त्यामुळे ते पुन्हा अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. अशा प्रकारे दर २९.५ वर्षांत शनीचे कडे दोन वेळा पृथ्वीवरून दिसेनासे होतात. यापूर्वी ते सप्टेंबर २००९ आणि १९९६ साली पृथ्वीवरून दिसेनासे झाले होते.

काही दशलक्ष वर्षांनी शनीचे कडे लुप्त होणार

दीड वर्षांनी शनीचे कडे पृथ्वीवरून दिसेनासे होणे हा तात्पुरता दृष्टिभ्रम असणार आहे. मात्र, काही शास्त्रज्ञांच्या मते शनीचे कडे निर्माण होऊन साधारण १०० दशलक्ष वर्षे झाली आहेत. ते हळूहळू लोप पावू लागतील. अर्थात ते पूर्णपणे नष्ट होण्यास आणखी काही दशलक्ष वर्षे जावी लागतील. शास्त्रज्ञांच्या मते पुढील ३०० दशलक्ष वर्षांनी शनीचे कडे खरोखरच संपलेले असतील.

logo
marathi.freepressjournal.in